गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:59 IST2025-12-26T10:58:15+5:302025-12-26T10:59:42+5:30
चिन्ह, पक्ष विसरून दिग्गज येणार एकाच झेंड्याखाली ? गेल्या चार दिवसांपासून जळगावात अतिशय गोपनीय बैठका पार पडत आहेत. एक बैठक मुंबईत राज्यस्तरीय नेत्यांसोबतही झाली.

गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
सुनील पाटील
जळगाव - महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी सत्ताधारी महायुतीमधीलच मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आता थेट विरोधकांच्या उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस यांच्यासोबत एकत्र येणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत कणकवली येथे भाजपाविरोधात शहर विकास आघाडी बनवून सगळे विरोधक एकवटले होते तसाच पॅटर्न जळगावात होण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ५७ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळविली होती. याच बळावर आताही जागावाटपात भाजप मित्रपक्षांना वाटा देण्यास फारसा उत्सुक नाही. भाजपाकडे इच्छुकांची मोठी फौज असल्याने निष्ठावंतांना न्याय देताना इतरांना डावलले जाण्याची भीती आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदेसेना आणि भाजपामध्ये झालेला संघर्ष आणि भाजपाकडून मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) मध्ये 'खदखद' आहे. हीच नाराजी आता बंडाच्या वाटेवर असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून जळगावात अतिशय गोपनीय बैठका पार पडत आहेत. एक बैठक मुंबईत राज्यस्तरीय नेत्यांसोबतही झाली. यात बड्या नेत्यांचाही थेट सहभाग असल्याचे बोलले जात आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस आणि एमआयएम यांची एक महाआघाडी आकारास येण्याच्या हालचाली आहेत.
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीनंतरही रणनीती
महायुतीमधील भाजपा व शिंदेसेना यांची बुधवारी रात्री एका हॉटेलात बैठक झाली. या बैठकीसाठी महायुतीचाच घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला लांब ठेवण्यात आले. या बैठकीत भाजपा व शिंदेसेना यांच्यात जागा वाटपावर चर्चा झाली. भाजपा ५५ व शिंदेसेना १७ अशी चर्चा झाली. राष्ट्रवादी सहभागी झाली तर ३ जागा द्यायचे असे ठरले. या बैठकीनंतर आमदार मंगेश चव्हाण यांची रात्री अकरा वाजेपर्यंत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात त्यांनी २६ जागांचा प्रस्ताव ठेवला. त्यावर आम्ही विचार करतो म्हणत चव्हाण माघारी फिरले. यानंतर उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षातील काही नेत्यांची आणखी महत्त्वाची बैठक झाली. जागा वाटपावरून शिंदेसेना नाराज आहेच, त्यांच्यासह सर्व पक्षांनी एकत्र येण्यावर पुन्हा रणनीती आखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपविरोधात लहान-मोठे - राजकीय पक्ष एकवटत असल्याचे चित्र जळगावमध्ये दिसून येत आहे.
चिन्ह कोणाचे, उमेदवार कोणाचे ?
राजकीय सोयीनुसार उद्धवसेनेचे उमेदवार 'घड्याळ' किंवा 'तुतारी'वर, तर राष्ट्रवादीचे उमेदवार 'मशाल' किंवा 'धनुष्यबाण'वर लढण्याची शक्यता आहे. या सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरवून भाजपाची कोंडी करण्याचे नियोजन आहे. भाजपाच्या तिकिटावर आलेले काही माजी निवडून नगरसेवकही ऐनवेळी या नवीन आघाडीत डेरेदाखल होण्याची चिन्हे आहेत.