तरुणाईला भावला एबीसीडी-२
By Admin | Updated: June 23, 2015 01:25 IST2015-06-23T01:25:54+5:302015-06-23T01:25:54+5:30
गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या एबीसीडी (एनी बडी कॅन डान्स) चा सिक्वल असलेल्या ‘एबीसीडी २’ने पहिल्याच आठवड्यात चांगला गल्ला जमविला

तरुणाईला भावला एबीसीडी-२
गेल्या शुक्रवारी रिलीज झालेल्या एबीसीडी (एनी बडी कॅन डान्स) चा सिक्वल असलेल्या ‘एबीसीडी २’ने पहिल्याच आठवड्यात चांगला गल्ला जमविला. पहिल्या तीन दिवसांत सुमारे ४६ कोटी रुपयांच्या उलाढालीसह या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवशी १४ कोटी रुपयांचा गल्ला जमविल्यानंतर महानगरातील तरुण प्रेक्षकांना हा चित्रपट आवडल्याचे संकेत मिळाले होते. शनिवारी चित्रपटाने १५ कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. रविवारी १७ कोटी मिळाले आणि एबीसीडी-२ च्या गल्ल्यात तीन दिवसांत ४६ कोटी रुपये जमा झाले. २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीत एबीसीडी-२ ने स्थान मिळविले.
चित्रपट जाणकारांच्या मते, सोमवारी उलाढालीत मोठी घट न झाल्यास येत्या दिवसांत शंभर कोटींच्या क्लबमध्ये या चित्रपटाला प्रवेश मिळू शकतो. मात्र, यासाठी अजून आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईसह अनेक भागांत जोरदार पाऊस पडत असतानाही या चित्रपटाला मिळालेले यश उल्लेखनीय आहे. मुंबईत शुक्रवारपासून रविवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता, तरीही या चित्रपटाला चांगले यश मिळाले. याशिवाय याच आठवड्यात रमजान महिनाही सुरू झाला. साधारणत: रमजानच्या काळात प्रेक्षक संख्येत
घट होते. मान्सून आणि रमजान अशा परिस्थितीतही या चित्रपटाला मिळालेले यश हे वाखाणण्याजोगे आहे, असे जाणकारांना वाटते.
याआधी बॉक्स आॅफिसवर आलेल्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास महेश भट्ट कंपनीतील मोहित सुरी यांच्या ‘हमारी अधूरी कहानी’च्या गल्ल्यात काहीशी सुधारणा नोंदली गेली आहे. पहिल्या आठवड्यात १६ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर आता हा आकडा दुप्पट झाला आहे. दुसऱ्या आठवड्यात म्हणजे चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस झाल्यानंतर ‘हमारी अधूरी कहानी’ने जवळपास ३० कोटींच्या घरात गल्ला जमविला. चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट झाला नसला तरी आकड्याच्या हिशोबात सुरक्षित जागी पोहोचल्याचे बोलले जात आहे.
झोया अख्तरचा ‘दिल धडकने दो’ कमाईच्या बाबतीत अजूनही खस्ता खात आहे. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटासाठी १०० कोटी कमाईच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग अजूनही दूरच असून ती सध्या जवळपास अशक्यकोटीतील बाब आहे. ‘दिल धडकने दो’चे जहाज बॉक्स आॅफिसवर बुडाल्याचे मानले जात आहे.
बॉक्स आॅफिसवर अजूनही दणक्यात सुरू असलेल्या कंगणा राणावतचा ‘तनू वेड्स मनू रिटर्न’ १५० कोटींच्या गल्ल्यापासून काही अंतरावर आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १४७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
येत्या शुक्रवारी व्यंगात्मक ‘टनकपूर हाजिर हो’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशच्या गावांतील खाप पंचायतीवर व्यंगाच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी करणाऱ्या या चित्रपटातून सामान्य प्रेक्षकांच्या हाती काही सापडण्याची आशा नाही. मोठ्या शहरांतील समजूतदार प्रेक्षकांना हा चित्रपट आवडू शकतो.