नावात काय आहे?

By Admin | Updated: November 16, 2015 02:26 IST2015-11-16T02:26:28+5:302015-11-16T02:26:28+5:30

नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. नावावाचून कुणाचे काही अडत नाही, असे त्याला सांगायचे असेल, पण नावाला असे दुर्लक्षित करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीचे नाव हीच त्याची ओळख असते.

What's in the name? | नावात काय आहे?

नावात काय आहे?

नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. नावावाचून कुणाचे काही अडत नाही, असे त्याला सांगायचे असेल, पण नावाला असे दुर्लक्षित करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीचे नाव हीच त्याची ओळख असते. फिल्मी स्टार्ससाठी तर नावच सर्वकाही असल्याने, अनेकांनी आपले मूळ नाव बदलून आकर्षक नाव धारण केले आणि या बदललेल्या नावांनी त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळाली, परंतु प्रसिद्धीच्या या वलयात त्यांचे मूळ नाव मात्र मागे पडले. अशाच काही प्रसिद्ध नायक-नायिकांच्या दुसऱ्या नामकरणाची ही रंजक कथा. अगदी अशोककुमार यांच्यापासून सुपरस्टार राजेश खन्ना, दिलीप कुमार, जितेंद्र ते अलीकडच्या काळातील हृतिक रोशन, रणवीर सिंहपर्यंत अनेकांनी आपली नावे बदलली आहेत. यात अभिनेत्रीदेखील मागे नसून, मधुबाला, रेखा, महिमा चौधरी ते प्रिती झिंटा यांनीदेखील आपली खरी नावे बदलली आहेत.
हिंदी सिनेसृष्टीत नाव बदलण्याचा ट्रेंड तसा खूपच जुना आहे. अशोक कुमार यांनी त्यांचे कुमुदलाल कुंजीलाल गांगुली हे खरे नाव बदलून, अशोक कुमार हे नाव धारण केले. बालपणापासूनच हिंदी सिनेसृष्टीचे आकर्षण असलेल्या अशोक कुमार यांनी १९३६ साली बॉम्बे टॉकीजच्या जीवन नैया या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पर्दापण केले. अर्थात, त्यांच्या ‘अशोक कुमार’ या बदललेल्या नावाने.
बॉलीवूडचा सुपरस्टार अशी ओळख असलेल्या राजेश खन्नाचे मूळ नाव जतीन खन्ना असे होते. कॉलेज जीवनापासूनच नाट्यस्पर्धांमध्ये ठसा उमटविणाऱ्या जतीनला ‘टॅलेंट हंट’ या मासिकाने प्रसिद्धी दिली अन् तेथूनच त्याला ब्रेक मिळाला. मात्र, नावाचा घोळ त्याला सतावत असल्याने, एका न्युमरॉलॉजिस्टने त्याला नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जतीनचा ‘राजेश’ झाला. पुढे याच ओळखीने त्याला त्याच्या चाहत्यांनी सुपरस्टारपर्यंत पोहोचविले.
अशीच काहीशी स्टोरी सुपरस्टार दिलीपकुमार यांच्याबाबतीत घडली आहे. १९४४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून चाहत्यांपर्यंत पोहोचलेल्या दिलीपकुमार यांचा प्रवास सुरू झाला. अर्थात, ‘युसूफखान’ हे नाव बदलूनच. पाकिस्तानातील पेशावर येथे जन्मलेल्या दिलीपकुमार यांचे खरे नाव मोहंमद युसूफ खान असे होते. मात्र, चाहत्यांना दिलीपकुमार भावल्याने पुढे त्यांचे हे नाव कायम राहिले आहे. आपल्या स्वतंत्र नृत्यशैलीने बॉलीवूडमध्ये आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता जितेंद्र यांनीही चित्रपटासाठी आपले खरे नाव बदलले. सुरुवातीला जितेंद्र यांचे वास्तव्य काही काळ गिरगाव येथे होते. गिरगावातील ‘त्या’ जुन्या चाळीत गणेशोत्सवाला जितेंद्र आजही आवर्जून हजेरी लावतो. जुन्या गिरगावकरांना जितेंद्र आजही ‘रवी कपूर’च असल्याचा अनुभव कित्येकदा आला आहे. मात्र जितेंद्र या नावामुळेच त्यांना बॉलीवूडमध्ये यश मिळविता आले, हे वास्तव नाकारता येणार नाही. बॉलीवूडमधील इतरही अनेक कलाकारांनी आपली मूळ नावे बदलली आणि चित्रपटासाठी आपल्या खऱ्या नावाचे ‘बारसे’ केले. काही वेळा या कलाकारांनी स्वत:हून आपले खरे नाव बदलले, तर काही वेळा अन्य मंडळींनी त्यांचे नाव बदलले. यातूनच राजीव हरी ओम भाटियाचा ‘अक्षयकुमार’, विजयसिंह देओलचा ‘बॉबी देओल’, रणवीरराज कपूरचा ‘राज कपूर’, शमशेरराज कपूरचा ‘शम्मी कपूर’, बलवीरराज कपूरचा ‘शशी कपूर’, बद्रुद्दिन जमालुद्दिन काझीचा ‘जॉनी वॉकर’, मीरा लांबाची ‘मिल्लका शेरावत’, बलराज दत्तचा ‘सुनील दत्त’, उमादेवीची ‘टुणटुण’, गौरांग चक्रवतीचा ‘मिथुन चक्रवती’, जयकिशन काकू भाईचा ‘जॅकी श्रॉफ’ तर अलीकडच्या काळातील हृतिक नागरथचा ‘हृतिक रोशन’, शाहिद खट्टरचा शाहिद कपूर, फरहान अब्राहमचा ‘जॉन अब्राहम’ रणवीर भवनानीचा ‘रणवीर सिंह’ अशी कित्येक नामकरणे झालेली उदाहरणे देता येतील.
‘शापित सौंदर्यवती’ अशी ओळख असलेल्या अभिनेत्री ‘मधुबाला’ हिने बाल कलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले, तेव्हा तिची ओळख ‘बेबी मधुबाला’ अशी होती. पुढे नायिका म्हणून काम करायला
सुरुवात केल्यानंतर तिचे नामकरण ‘मधुबाला’ असे झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या पिढीतील अभिनेत्री देविकाराणी यांनी चित्रपटासाठी ‘मधुबाला’ असे तिला दिले होते. तिचे खरे नाव ‘मुमताजजहाँ बेगम देहलवी’असे आहे. पुढे ‘मधुबाला’ हिने दीर्घकाळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले, तर ‘भानुरेखा गणेशन’ हे सगळ्यांसाठी अपरिचित असलेल्या नावालादेखील सौंदर्याची धार लागलेली आहे. चाहत्यांच्या मनात घर करून असलेल्या ‘रेखा’ हिचे नाव भानुरेखा गणेशन असून, बदलेल्या नावाने तिला प्रसिद्धीच्या वेगळ्याच वलयात नेऊन ठेवले आहे. अभिनेत्रीमध्ये रितू चौधरीची ‘महिमा चौधरी’, प्रीतम सिंह झिंटाची ‘प्रीती झिंटा’ तर वादाच्या भोवऱ्यात नेहमीच गुरफटलेल्या सनी लिओनचे खरे नाव करनजीत कौर वोहरा असे आहे.

Web Title: What's in the name?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.