कुस्ती म्हणजे काय रे बाबा?
By Admin | Updated: July 1, 2016 01:09 IST2016-07-01T01:09:19+5:302016-07-01T01:09:19+5:30
सुलतान या आगामी चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा एका कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे

कुस्ती म्हणजे काय रे बाबा?
सुलतान या आगामी चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा एका कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा ही खूपच वेगळी भूमिका आहे. या चित्रपटात ती कुस्तीपटूची भूमिका साकारत असली तरी तिने आयुष्यात कधी कुस्तीच पाहिली नाहीये असे सांगतेय अनुष्का शर्मा. सुलतान या चित्रपटाबद्दल अनुष्काने ‘सीएनएक्स’सोबत मारलेल्या गप्पा...
प्रश्न : तू सुलतान या चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका साकारत आहेस, या भूमिकेसाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
4या चित्रपटात काम करण्याआधी मला कुस्ती या खेळाविषयी खूपच कमी माहिती होती. मला या चित्रपटासाठी विचारण्यात आल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा कुस्तीविषयी मला जितकी माहिती मिळवता येईल तितकी मिळवली. कोणतीही भूमिका साकारताना तिच्यावर मेहनत घेणे हे गरजेचे आहे असे मला वाटते. मला नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची खूप आवड आहे आणि त्याचाच फायदा मला या भूमिकेसाठी झाला. मी कुस्तीविषयी सगळी पुस्तके वाचली. टीव्हीवर कुस्ती पाहिली. या सगळ्यातून माझी भूमिका अधिकाधिक चांगली साकारण्यास मला मदत झाली. तसेच सहा आठवडे तरी मी कुस्ती खेळण्याचे ट्रेनिंग घेतले. माझ्या लूकवर, तसेच देहबोलीवरही मी अभ्यास केला. कुस्ती खेळणे हे माझ्यासाठी खूप कठीण होते. आपल्याला कोणी अनोळखी व्यक्तीने स्पर्श केला तर आपण लगेचच भडकतो, कुस्ती खेळताना तर सतत स्पर्श होतच असे. त्यामुळे ही गोष्ट माझ्या मनाला समजवायला वेळ लागला.
प्रश्न : सलमान खानच्या चित्रपटात अभिनेत्रीला महत्त्व नसते असे म्हटले जाते, तू याविषयी काय सांगशील?
4सुलतानमध्ये सलमान इतकीच माझीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे या चित्रपटात अभिनेत्रीला कमी महत्त्व आहे असे कधी मी म्हणणार नाही. आपली इंडस्ट्री ही गेल्या काही वर्षांत खूप बदलत आहे. स्त्रीप्रधान चित्रपट येत आहेत आणि प्रेक्षकांची त्यांना पसंतीही मिळत आहे. केवळ अभिनयक्षेत्रातच नव्हे, तर तांत्रिक क्षेत्रातही स्त्रियांची संख्या खूप वाढत आहे याचा मला आनंदच आहे.
प्रश्न : बॉलीवूडमध्ये गॉडफादर नसतानाही स्थिरावणे किती कठीण आहे असे तुला वाटते?
4माझ्या कुटुंबातील कोणीही बॉलीवूडमध्ये नसल्याने मला गॉडफादर असण्याचा प्रश्नच नव्हता. मी आज जे काही स्थान प्राप्त केले आहे, ते स्वत:च्या हिमतीवर मिळवलेले आहे. गॉडफादर असण्याची गरज असते असे मला वाटत नाही. केवळ चांगला अभिनय करणे, मेहनत घेणे आणि आपल्या भूमिकेला योग्य न्याय देणे हे आवश्यक असते असे मला वाटते.
प्रश्न : या चित्रपटानंतर कुस्तीपटू होण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना काही फायदा होईल का?
4आपल्या देशात कुस्ती खेळण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना त्यांच्या घरातून नेहमीच विरोध करण्यात येतो. खूपच कमी कुटुंबातील मंडळी आपल्या मुलीला कुस्ती खेळण्यासाठी पाठिंबा देतात. या चित्रपटामुळे लोकांचा कुस्तीकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी मला आशा आहे.
प्रश्न : एक अभिनेत्री आणि एक निर्माती या दोन्ही गोष्टींमध्ये तू कोणती गोष्ट अधिक एन्जॉय करतेस?
4निर्माती म्हणून चित्रपटाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये लक्ष द्यावे लागते. अभिनय करत असताना केवळ आपली भूमिका साकारायची हे एकच काम असते. मी या दोन्ही गोष्टी एन्जॉय करते. एक कलाकार म्हणून चित्रपटाची कथा निवडताना तुम्हाला खूपच चोखंदळ असावे लागते. एकदा चित्रपट स्वीकारल्यानंतर तुम्ही चित्रपटाच्या कथेबाबत काहीही करू शकत नाही. पण निर्माती असताना प्रत्येक टप्प्यावर कथा अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता हा सगळ्यात मोठा फायदा निर्मितीचा आहे असे मला वाटते.
हॉलीवूड, बॉलीवूड, टीव्ही अन् मराठी चित्रसृष्टीच्या रंजक बातम्या व गॉसिप वाचण्यासाठी लॉगइन करा