‘वेलकम बॅक’ची बॉक्स आॅफिसवर धमाल
By Admin | Updated: September 8, 2015 11:06 IST2015-09-08T05:02:11+5:302015-09-08T11:06:29+5:30
विनोदी चित्रपटासाठी आवश्यक असलेला भरपूर मसाला असलेला व दिग्दर्शक अनिस बाजमी आणि निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या ‘वेलकम बॅक’चे प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले आहे.

‘वेलकम बॅक’ची बॉक्स आॅफिसवर धमाल
विनोदी चित्रपटासाठी आवश्यक असलेला भरपूर मसाला असलेला व दिग्दर्शक अनिस बाजमी आणि निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या ‘वेलकम बॅक’चे प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केले आहे. पहिल्या वीकेंडला त्याने बॉक्स आॅफिसवर ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून सुरुवात उत्तम केली. नाना पाटेकर, अनिल कपूर, डिंपल कपाडिया, जॉन अब्राहम आणि परेश रावलसारख्या कलावंतांमुळे मल्टिस्टारर बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धमाल केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी ‘वेलकम बॅक’ने १४ कोटी रुपयांची कमाई करून चांगली सुरुवात केली होती. शनिवारी त्याची कमाई १७ कोटी तर रविवारी २० कोटींच्या जवळपास झाली होती. या पद्धतीने ‘वेलकम बॅक’ची एकूण कमाई ही ५१ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. साधारणत: ८० कोटी रुपये या चित्रपटासाठी गुंतविण्यात आले होते. जाणकारांचा अंदाज असा की पहिल्या आठवड्यातील कमाईमध्ये त्याची ही गुंतवणूक वसूल होईल. १०० कोटींच्या क्लबमध्येही ‘वेलकम बॅक’चा समावेश होण्याची शक्यता आहे.
याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानात जाऊन ठार मारण्याच्या कथेवरील ‘फँटम’ मात्र गडबडला. पहिल्या आठवड्याच्या शेवटी त्याची कमाई (अनेक प्रकारे प्रसिद्धी करूनही) ३३ कोटींची झाली. सोमवारपासूनच तो गर्दीच्या दुष्काळाला तोंड देऊ लागला. नंतरच्या सात दिवसांत त्याचा व्यवसायाचा वेग मंदावला. प्रदर्शित झाल्यापासून ‘फँटम’ने आतापर्यंत ४८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून ‘फँटम’च्या निर्मितीवर ७० कोटी रुपये खर्च झाले आहेत, असे समजले जाते. जाणकारांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटाच्या गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागणार, असे दिसते. या वर्षीच्या अपयशी चित्रपटांच्या यादीत ‘फँटम’दाखल झाला आहे.
त्याच्याबरोबर प्रदर्शित झालेला कुणाल कपूर व राधिका आपटेची भूमिका असलेला ‘कौन कितने पानी में’ पहिल्या तीन दिवसांतच बॉक्स आॅफिसच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला होता. दिग्दर्शक केतन मेहतांचा २२ वर्षे पहाड तोडून रस्ता बनविण्याच्या जिद्दीची कथा असलेला ‘मांझी - ए माऊंटेन मॅन’चा गल्ला १२ कोटी रुपयांचा झाला आहे. या चित्रपटाची पार्श्वभूमी बघता हा व्यवसाय खूप चांगला समजला जात आहे. ऋषी कपूर आणि अभिषेक बच्चनचा ‘आॅल इज वेल’देखील बॉक्स आॅफिसच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे.
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या व बॉलीवूडसह सगळ्या जगाच्या नजरा सलमान खानच्या प्रॉडक्शन कंपनीत तयार झालेल्या ‘हीरो’कडे
लागल्या आहेत. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘हीरो’च्या या रिमेकमध्ये सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज प्रथमच प्रेक्षकांसमोर येत आहेत. या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा सातमजली असल्यामुळे प्रत्येक जण त्याच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे.