कमजोर कथानकाचा बेरंग ‘रंगून’!

By Admin | Updated: February 27, 2017 00:23 IST2017-02-27T00:23:40+5:302017-02-27T00:23:40+5:30

‘रंगून’कडून सैफ, शाहिद व कंगना यांनाच नाही, तर प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा होत्या.

Weird storyline 'colorful' colorless! | कमजोर कथानकाचा बेरंग ‘रंगून’!

कमजोर कथानकाचा बेरंग ‘रंगून’!

- जान्हवी सामंत
‘रंगून’कडून सैफ, शाहिद व कंगना यांनाच नाही, तर प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा होत्या. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. पण प्रत्यक्षात चित्रपट काहीशी निराशा करतो. सैफ अली खान, शाहिद कपूर आणि ग्लॅमरस कंगना या दमदार तिकडीचा अभिनय केवळ कमजोर कथानकामुळे व्यर्थ वाटून जातो.
‘फिअरलेस नादिया’ या अ‍ॅक्शन लेडीच्या आयुष्याशी मिळत्याजुळत्या ज्युलिया (कंगना राणौत) नामक पात्राच्या एन्ट्रीसोबत चित्रपट सुरू होतो. दुसरे महायुद्ध सुरू आहे आणि नेताजी सुभाषचंद्र्र बोस यांची आझाद हिंद सेना भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र करण्यासाठी लढते आहे. अशा युद्धाच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक (शाहिद कपूर), रूसी बिलीमोरिया (सैफ अली खान) व ज्युलिया (कंगना) ही तीन पात्रे आपल्याला भेटतात. रूसी एका स्टुडिओचा मालक असतो. अ‍ॅक्शन स्टार व निर्मा$ता असलेला रूसी एका स्टंटमध्ये आपला हात गमावतो आणि यानंतर त्याचे अ‍ॅक्शन करिअर संपुष्टात येते. ज्युलिया ही त्या काळची एक लोकप्रिय अभिनेत्री असते तर नवाब मलिक ब्रिटिश सैन्यातला एक भारतीय जवान असतो. जपानी सैन्याच्या तावडीत युद्धकैदी म्हणून आठ महिने घालवल्यानंतर नवाब मलिक एक दिवस त्यांच्या तावडीतून निसटतो. ज्युलिया ही रूसीच्या प्रेमात असते. एक दिवस रूसीसोबत लग्न करण्याचे स्वप्न ती रंगवत असते. याचदरम्यान ब्रिटिश आर्मी आपल्या जवानांच्या मनोरंजनासाठी एका मोठ्या स्टारला पाठवण्याची विनंती रूसीला करते. रूसी यासाठी ज्युलियाला बर्मा बॉर्डरवर पाठविण्याचा निर्णय घेतो. रूसी तिच्यासोबत जाऊ शकणार नसतो. त्यामुळे ज्युलियाच्या सुरक्षेसाठी तिच्यासोबत एका तुकडीला पाठवले जाते. या तुकडीत नवाब मलिकचाही समावेश असतो. पण अचानक स्थिती बिघडते आणि ज्युलिया व नवाब तुकडीपासून तुटून शत्रूंच्या इलाक्यात फसतात. शत्रूंच्या तावडीतून सहीसलामत सुटून दोघांनाही भारतीय हद्दीत परतायचे असते. कोसळणारा पाऊस, उपासमार आणि शत्रूंची भीती अशा सगळ्या वातावरणात ज्युलिया व नवाबमध्ये आकर्षण व प्रेमाचा खेळ सुरू होतो. शत्रूंना चुकवून ज्युलिया व नवाब कसेबसे भारतीय सीमेवर पोहोचतात पण त्यांच्या प्रेमात रूसी अडथळा बनून उभा राहतो.
चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. युद्ध आणि नवाब-ज्युलियाचे बहरते प्रेम यामुळे हा चित्रपट मध्यांतरापर्यंत सुसह्य वाटतो. पण उत्तरार्धात युद्ध, पे्रम, विश्वासघात असे सगळे दाखविण्याच्या नादात चित्रपट पुरता भरकटतो. चित्रपट रंगवण्याच्या नादात लांबच लांब दृश्ये आणि अनावश्यक क्लायमॅक्समुळे तो कंटाळवाणा होतो. पूर्वार्धात चित्रपटाचा शेवट काय होणार, हे कळून चुकल्याने सगळी उत्सुकताही संपते. कागदावर चित्रपटाची कथा इंटरेस्टिंग वाटत असली तरी प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना त्यात काहीही इंटरेस्टिंग जाणवत नाही. चित्रपटातील गाणीही कंटाळवाणी वाटतात. चित्रपटातील पात्रेही प्रभावहिन वाटतात. मुख्य पात्रांवर फारशी मेहनत घेतली गेलेली नाही, हेही स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे सगळ्या चित्रपटाचा भार एकटी कंगना आपल्या खांद्यावर पेलताना दिसते. केवळ कंगनाच या चित्रपटात काहीसा प्रभाव टाकते. पण दुर्दैवाने तिचे ग्लॅमर आणि स्टाईल हेच अधिक भाव खाऊन जाते. कॅप्टन अमेरिकासारखे पात्र तर प्रचंड निराशा करते. दृश्यांपाठोपाठ दृश्ये येतात; पण ग्लॅमर आणि स्टाईल यापलीकडे त्यातील काहीच आपल्याला अपील होत नाही. चित्रपटाचे काही सीन्स चांगले आहेत. कंगना आणि जपानी अपहृत यांच्यातील काही सीन्सशिवाय कंगना व सैफ यांच्यातील एक-दोन दृश्ये वगळली तर चित्रपट कुठेही तुम्हाला बांधून ठेवत नाही.
सरतेशेवटी इतकेच म्हणावेसे वाटते की, विशाल भारद्वाजच्या चित्रपटाकडून इतकी निराशा अपेक्षित नसते.

Web Title: Weird storyline 'colorful' colorless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.