चहा पिऊन तुमचा काय फायदा झालाय? 'पंचायत'च्या प्रल्हादने उपस्थित केला मोठा प्रश्न, काय म्हणाला?
By देवेंद्र जाधव | Updated: July 1, 2025 16:16 IST2025-07-01T16:15:35+5:302025-07-01T16:16:08+5:30
पंचायत वेबसीरिजमधील प्रल्हादने चहा पिण्याचे दुष्परिणाम सांगितलं आहेत. शिवाय त्याने ९ वर्षांपासून चहा पिणं का बंद केलं, यामागचं चकित करणारं कारण सांगितलं आहे

चहा पिऊन तुमचा काय फायदा झालाय? 'पंचायत'च्या प्रल्हादने उपस्थित केला मोठा प्रश्न, काय म्हणाला?
'पंचायत ४' वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजमधील प्रत्येक कॅरेक्टर्सला प्रेक्षकांनी चांगलं प्रेम दिलं. याच वेबसीरिजमधील आणखी एक गाजलेलं कॅरेक्टर म्हणजे प्रल्हाद चा. अभिनेता फैसल मलिकने हे कॅरेक्टर साकारलं. अंगापिंडाने मजबुत परंतु मनाने हळवा असलेला प्रल्हाद सर्वांचं मन जिंकून गेला. प्रल्हादची भूमिका साकारणारा फैसल मलिक गेल्या ८-९ वर्षांपासून चहा पित नाहीये. यामागचं कारण फैसलने सांगितलं. इतकंच नव्हे अभिनेत्याने चहा पिणं किती त्रासाचं आहे, हेही सांगितलंय.
म्हणून चहा पित नाही प्रल्हाद
फैसल मलिकने डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत चहा का पित नाही, याचा खुलासा केलाय. फैसल म्हणतो, "दारू पिणं तब्येतीसाठी हानिकारक आहे. त्याऐवजी लस्सी किंवा दूध प्या. दारु प्यायची काय गरज. मी चहा-कॉफी जास्त पित नाही. खूप कंटाळवाणी गोष्ट आहे ती. खरंच सांगतोय मी, चहा ही अजिबात कामाची गोष्ट नाही. चहापेक्षा भयंकर या जगात काहीच नाही. चहाचं लोकांनी आणखी नुकसान असं केलंय की, त्यासोबत गरम मसाले चहात मिसळले जातात. त्यामुळे काही होत नाही. अॅसिडीटी होते."
"कोणीतरी मला सांगितलं की, ब्लॅक कॉफी घेतल्याने लिव्हर साफ होतं. त्यामुळे सध्या मी ब्लॅक कॉफी पितो. मी ८-९ वर्षापासून चहा पित नाहीये. एका ज्ञानी माणसाने मला रात्री सांगितलं की, काय आहे हे सर्व. चहाचा काही फायदा आहे? चहा पिऊन तुझा काय फायदा झालाय सांग मला? मी म्हटलं काही नाही. त्यापेक्षा काहीतरी वेगळं पी, डोकं तरी चालेल. त्यामुळे चहाला लाथ मारुन मी आता पित नाही. मी आता दूधही पित नाही." अशाप्रकारे पंचायतच्या प्रल्हादने खुलासा केला. फैसल मलिकने पंचायतच्या चारही सीझनमध्ये प्रल्हादची भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मन जिंकलंय.