आदिनाथ कोठारेच्या आगामी वेबसीरिज 'डिटेक्टिव धनंजय'चा मुहूर्त संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:01 IST2025-11-10T17:01:23+5:302025-11-10T17:01:43+5:30
Adinath Kothare's Detective Dhananjay Web Series : 'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिजमध्ये आदिनाथ कोठारे एका डिटेक्टिवच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या वेब सीरिजसाठी आदिनाथ अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका बजावताना दिसणार आहे.

आदिनाथ कोठारेच्या आगामी वेबसीरिज 'डिटेक्टिव धनंजय'चा मुहूर्त संपन्न
अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या चर्चेत आला आहे. त्याची निर्मिती संस्था कोठारे व्हिजनच्या 'नशीबवान' मालिकेत तो काम करताना दिसत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी आदिनाथने नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. तो लवकरच 'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्याचा प्रोमोदेखील समोर आला होता. या बहुचर्चित वेबसीरिजचा मुहूर्त नुकताच संपन्न झाल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं.
'डिटेक्टिव धनंजय' वेबसीरिजमध्ये आदिनाथ कोठारे एका डिटेक्टिवच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या वेब सीरिजसाठी आदिनाथ अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका बजावताना दिसणार आहे. नुकताच मुंबईत डिटेक्टिव धनंजय या वेबसीरिजचा मुहूर्त संपन्न झाला आणि वेबसीरिजच्या शूटला सुरुवात झाली आहे. झी ५ वर ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. गिरीश जोशी यांनी या सीरिजसाठी स्क्रीनप्ले लिहिला असून श्रीरंग गोडबोले निर्मितीसोबतच दिग्दर्शन करणार आहेत.
डिटेक्टिव धनंजयबद्दल आदिनाथ म्हणाला...
डिटेक्टिव धनंजय या वेबसीरिजबद्दल पहिल्यांदा व्यक्त होताना आदिनाथ कोठारे म्हणाला की,"प्रेक्षकांसाठी कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन येण्याकडे माझा कल असतो आणि प्रेक्षकांचं प्रेम मला कायम नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भाग पाडते. डिटेक्टिव धनंजयमधून देखील काहीतरी खास घेऊन येणार आहोत हे नक्की! कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेबसीरिज मधून उलगडणार असून निर्माता आणि अभिनय या दोन्ही भूमिका यासाठी करणार आहे आणि मला याची फार उत्सुकता आहे. ओटीटी विश्वात काहीतरी वेगळं हटके घेऊन येण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहेत."
आगामी प्रोजेक्ट
आगामी काळात देखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार आहे.