शाहिद कपूर साकारणार 'महाभारत'मधील अश्वत्थामा, रितेश देशमुखची वहिनी करणार सिनेमाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:28 AM2024-03-20T10:28:10+5:302024-03-20T10:29:22+5:30

शाहिद कपूरच्या अश्वत्थामा सिनेमाची घोषणा! ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट

shahid kapoor ashwatthama the saga continues movie announced release on amazon prime ott | शाहिद कपूर साकारणार 'महाभारत'मधील अश्वत्थामा, रितेश देशमुखची वहिनी करणार सिनेमाची निर्मिती

शाहिद कपूर साकारणार 'महाभारत'मधील अश्वत्थामा, रितेश देशमुखची वहिनी करणार सिनेमाची निर्मिती

बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता शाहिद कपूर हा अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या शाहिदने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. कधी डॅशिंग हिरो तर कधी कॉमेडी भूमिकेत दिसणारा शाहिद ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांना विशेष भावला. पद्मावत या सिनेमात त्याने महाराज रतन सिंह यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा शाहिद ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदच्या नव्या सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. 

अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून #AreYouReady या इव्हेंटमध्ये तब्बल ६९ सिनेमा आणि वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. यामध्ये 'अश्वत्थामा' या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. याबरोबरच शाहीद कपूर या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 'अश्वत्थामा' सिनेमाबाबत शाहिदने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. शाहिदला पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 'अश्वत्थामा' सिनेमातून महाभारतातील गुरू दौर्णाचार्य यांचा पुत्र आणि महान योद्धा असलेल्या अश्वत्थामाची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. 

'अश्वत्थामा : द सागा कंटिन्यू...' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजू दिग्दर्शक सचिन रावी सांभाळणार आहेत. तर विशू भगनानी, जॅकी भगनानी सिनेमाची निर्मिती करणार आहेत. 'अश्वत्थामा' सिनेमाच्या निर्मिती टीममध्ये रितेश देशमुखची वहिनी दिपशिखा देशमुखदेखील आहे. हिंदी, कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित केला जाणार आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून 'अश्वत्थामा' सिनेमाची चर्चा सुरू होती. या सिनेमात अश्वत्थामाच्या भूमिकेसाठी विकी कौशलची वर्णी लागली होती. 'द इमॉर्टल अश्वत्थामा' या नावाने आदित्य धर हा सिनेमा बनवणार होता. पण, 'आर्टिकल ३७०' सिनेमाच्या वेळी हा सिनेमा करत नसल्याचं त्याने सांगितलं होतं. 

Web Title: shahid kapoor ashwatthama the saga continues movie announced release on amazon prime ott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.