भांडणं मिटलं? संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजचं प्रीमिअर, सलमान खानचीही हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 13:18 IST2024-04-25T13:17:22+5:302024-04-25T13:18:05+5:30
सलमान खान आणि संजय लीला भन्साळी दोघांची मैत्री खूप जुनी आहे.

भांडणं मिटलं? संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' सीरिजचं प्रीमिअर, सलमान खानचीही हजेरी
बॉलिवूडचे दिग्गज फिल्ममेकर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या आगामी 'हीरामंडी' (Heeramandi) सीरिजची सर्वत्र चर्चा आहे. १ मे रोजी सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. त्याआधी काल सीरिजचा भव्य प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमिअरसाठी सीरिजमधील सर्व कास्ट आणि अख्खं बॉलिवूड आलं होतं. संजय लीला भन्साळी सर्वांचेच लाडके दिग्दर्शक आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कलाकारांनी ट्रेडिशनल स्टाईलमध्ये हजेरी लावत प्रीमिअरची शोभा वाढवली. यावेळी भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) एन्ट्रीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
'हीरामंडी' सीरिजमध्ये सहा अभिनेत्रींची स्टारकास्ट आहे. मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्डा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, शिवाय फरदीन खान, शरमीन सेगल मेहता या मुख्य भूमिकेत आहेत. भव्य सेट, भरजरी कॉस्च्युम ही खासियत यातही दिसून येतेय. काल झालेल्या सीरिजच्या प्रीमिअरला स्टारकास्टसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. आलिया भट, नीतू कपूर, सोनी राजदान, करण जोहर, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर सह अनेक कलाकार दिसले. यावेळी सलमान खानही पोहोचला तेव्हा सर्वांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. ब्लॅक शर्ट आणि फंकी व्हाईट पँट या लूकमध्ये पोहोचला. सलमानचा संजय लीला भन्साळींसोबतचा फोटोही व्हायरल होत आहे. दोघांमधील भांडणं अखेर संपल्याचं यातून स्पष्ट होतंय.
सलमान खान आणि संजय लीला भन्साळी दोघांची मैत्री खूप जुनी आहे. 'खामोशी','हम दिल दे चूके सनम','सांवरिया' सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. यानंतर दिग्दर्शक-अभिनेत्याची ही जोडी इंशाअल्लाह सिनेमाच्या तयारीला लागली होती. 'इंशाअल्लाह' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये एका कारणावरुन वाद झाला आणि सलमान खान सेट सोडून गेला. यानंतर सिनेमाही डबाबंद झाला. आता दोघंही एकत्र आल्याने पुन्हा 'इंशाअल्लाह' च्या आशा पल्लवित झाल्या आहेत.