प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत, दिसणार अॅक्शन सीन करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:18 IST2025-08-08T16:17:14+5:302025-08-08T16:18:19+5:30
Priya Bapat : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट आता एका नव्या आणि थरारक अवतारात दिसणार आहे.

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत, दिसणार अॅक्शन सीन करताना
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आता एका नव्या आणि थरारक अवतारात दिसणार आहे. अमेझॉन प्राईमवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या अंधेरा या हॉरर सीरिजमध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सुकता निर्माण केली आहे. या सीरिजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले आहे. यात ती पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे.
प्रिया बापट म्हणाली की, ''मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करते आहे आणि हा अनुभव खरोखरच वेगळा ठरला. खूप नाईट शिफ्ट्समध्ये शूटिंग केलं, परंतु स्क्रीप्ट इतकी इंटरेस्टिंग होती की काम करताना काहीच जाणवले नाही. जेव्हा ही स्क्रिप्ट मला मिळाली, तेव्हा वाचून एकच विचार मनात आला, तो म्हणजे सध्या वाचलेल्या स्क्रिप्ट्सपैकी हे सर्वात उत्तम होतं. ही कथा फार वेगवेगळ्या पद्धतीने उलगडते आणि म्हणूनच ती अभिनयाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ठरली. यात अॅक्शन सीक्वेन्सेस आहेत, भीतीदायक हॉरर सीन आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळीच मजा आली.''
''आतापर्यंत मी राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या सिरीजमध्ये मी एका पूर्णतः वेगळ्या प्रोफेशनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठीत मला जसं प्रेम मिळालं, तसंच प्रेम मला हिंदी प्रोजेक्ट्ससाठीही मिळालं, याचा खूप आनंद आहे. आता हॉरर जॉनरमधून मी प्रेक्षकांचं मन कसं जिंकू शकेन, याचीच उत्सुकता लागली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला मी प्रचंड उत्सुक आहे. आशा आहे, प्रेक्षक या भूमिकेलाही तितकंच प्रेम देतील.'', असे प्रियाने म्हटले.