'पंचायत' चे पुढचे दोन्ही सीझन एकत्रच होणार शूट? सीरिजबाबत महत्वाची अपडेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 15:56 IST2024-08-29T15:55:40+5:302024-08-29T15:56:11+5:30
Panchayat Web Series: कधी होणार शूटिंगला सुरुवात?

'पंचायत' चे पुढचे दोन्ही सीझन एकत्रच होणार शूट? सीरिजबाबत महत्वाची अपडेट समोर
'पंचायत' (Panchayat) ही वेब विश्वातील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. नुकताच सीरिजचा तिसरा सीझन आला होता. पहिल्या दोन सीझनप्रमाणेच याही सीझनला खूप पसंती मिळाली. साधी गोष्ट, अप्रतिम अभिनय यामुळे सीरिजचे अनेक चाहते आहेत. दरम्यान आता पंचायत चे पुढील २ सीझन हे एकत्रच शूट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये शूटिंगला सुरुवात होणार आहे.
'पंचायत' ही फुलेरा गावाची कहाणी आहे. येथील प्रधानची, सरपंच, सचिव आणि एकंदर गावातलं राजकारण याभोवती कहाणी फिरते. तिसऱ्या सीझनच्या शेवटी बऱ्याच गोष्टी घडल्या. प्रधानजींवर हल्ला झाला असून ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तर सचिवजी परीक्षा देऊन परत आले आहेत. प्रधानजींवर नक्की कोणी हल्ला केला हे पुढच्या सीझनमध्ये कळणार आहे. चौथ्या सीझनमध्ये तीन ट्रॅक चालणार आहेत. एक म्हणजे निवडणूक, दुसरं सचिव आणि रिंकीची लव्हस्टोरी आणि प्रल्हादचा निवडणुकीला असणारा विरोध या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. हे सगळं दोन सीझनमध्ये दाखवण्यात येणार असून एकत्रच शूटिंगही केलं जाणार आहे.
आतापर्यंत 'पंचायत' तीनही सीझनमध्ये नवीन कॅरेक्टर्सची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता चौथ्या आणि पाचव्या सीझनमध्ये काय धमाल येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. तसंच हे दोन सीझन शेवटचे असणार का याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. 'पंचायत'च्या पुढील अपडेट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.