"नागराज मंजुळेंसोबत काम करणं माझं स्वप्न होतं...", 'मटका किंग' विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला- "सैराट, फँड्रीमध्ये..."
By कोमल खांबे | Updated: April 8, 2026 12:47 IST2026-04-08T12:47:02+5:302026-04-08T12:47:25+5:30
'मटका किंग'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये कलाकारांसह नागराज मंजुळेंनीही हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये विजय वर्माने नागराज मंजुळेंचं कौतुक करत त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं.

"नागराज मंजुळेंसोबत काम करणं माझं स्वप्न होतं...", 'मटका किंग' विजय वर्माची प्रतिक्रिया, म्हणाला- "सैराट, फँड्रीमध्ये..."
विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या 'मटका किंग' या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरिजचं लेखन, निर्मितीची बाजू सांभाळण्यासोबतच दिग्दर्शनही मराठमोळे नागराज मंजुळे यांनी केलं आहे. 'मटका किंग'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये कलाकारांसह नागराज मंजुळेंनीही हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये विजय वर्माने नागराज मंजुळेंचं कौतुक करत त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं.
"नागराज मंजुळेंसोबत काम करणं हे माझं स्वप्न होतं. जेव्हा त्यांनी मला मटका किंगसाठी विचारलं तेव्हा खरं तर मला विश्वासच बसत नव्हता. त्यांनी मला का विचारलं असेल कारण त्यांना तर अभिनेत्याची गरजच नाही. त्यांनी फँड्री सिनेमात कलाकार नसलेल्या व्यक्तींना कास्ट केलं होतं. सैराटमधून त्यांनी दोन कलाकार लाँच केले ज्यांनी त्याआधी कधीच काम केलं नव्हतं. झुंड सिनेमातही अमिताभ बच्चन सोडले तर बाकी सगळे कलाकार हे इंडस्ट्रीत नवीन होते. अभिनय माहीत नसलेले कलाकार त्यांच्या सिनेमात इतकं चांगलं काम करू शकतात. तर मग मला भीती होती की माझा अभिनय तर पकडला जाईल. त्यामुळे मला काही गोष्टी माहीत नाहीत असं समजून काम करावं लागलं. आपल्याकडे असलेल्या चांगल्या दिग्दर्शकांपैकी ते एक आहेत. मला त्यांच्यासोबत आणखी प्रोजेक्टमध्ये काम करायला आवडेल. नागराज सर जर मी चांगलं काम केलं असेल तर आपण पुन्हा एकत्र काम करूया", असं विजय वर्मा म्हणाला.
‘मटका किंग’मध्ये विजय वर्मा प्रमुख भूमिकेत असून कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय भारत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १७ एप्रिलपासून ही वेब सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित केली जाणार आहे.