कोरियन इंडस्ट्रीतील सर्वात फेमस जोडी अखेर लग्नबंधनात अडकली, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:40 IST2025-12-26T11:38:56+5:302025-12-26T11:40:43+5:30
गेल्या एका दशकापासून एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहिलेल्या या जोडीच्या लग्नामुळे चाहते आनंदी झालेत.

कोरियन इंडस्ट्रीतील सर्वात फेमस जोडी अखेर लग्नबंधनात अडकली, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
"जीनी, मेक अ विश' फेम किम वू-बिन याने 'होमटाउन चा-चा-चा' फेम शिन मिन-ए हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. जगभरातील के-ड्रामा चाहत्यांचे लाडक्या जोडप्यानं अखेर १० वर्षांच्या डेटिंगनंतर नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.२० डिसेंबर २०२५ रोजी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथील प्रसिद्ध 'शिला हॉटेल'मध्ये एका शाही सोहळ्यात हे जोडपे विवाहबंधनात अडकले. गेल्या एका दशकापासून एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहिलेल्या या जोडीच्या लग्नामुळे चाहते आनंदी झालेत.
या लग्नसोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. किम वू-बिनचा जुना आणि जिगरी मित्र ली क्वांग-सू याने या संपूर्ण लग्नाचे आयोजन केले होते, ज्यामुळे हा सोहळा अधिकच खास ठरला. १० वर्षांहून अधिक काळ डेटिंग केल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांच्या एजन्सीने या लग्नाची अधिकृत घोषणा केली होती.
लग्नाच्या खास प्रसंगी किम वू-बिनने चाहत्यांसाठी एक हस्तलिखित पत्र शेअर केले. त्याने लिहिले, "मी लग्न करतोय. ज्या व्यक्तीसोबत मी आयुष्यातील बराच काळ घालवला आहे, तिच्यासोबत मी आता नवीन कुटुंब सुरू करत आहे. आमचा हा पुढील प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे".
खऱ्या अर्थाने एकमेकांचे 'सपोर्ट सिस्टम'
जेव्हा किम वू-बिनला 'नासोफॅरिंजियल कॅन्सर' (नाकपुडीचा कर्करोग) झाल्याचे निदान झाले होते, तेव्हा शिन मिन-ए त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. त्यांच्यामध्ये ५ वर्षांचे अंतर असले तरी, त्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम यापुढे वय कधीच अडथळा ठरले नाही. आता कायदेशीररित्या जीवनसाथी बनून त्यांनी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.