Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से
By ऋचा वझे | Updated: January 30, 2025 13:34 IST2025-01-30T13:32:45+5:302025-01-30T13:34:12+5:30
'बंदिश बँडिट्स' मधील संगीत कसं बनलं? कशी होती ती प्रक्रिया.. श्रेया चौधरीने 'लोकमत फिल्मी'सोबत साधला संवाद

Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से
>>ऋचा वझे
ओटीटी विश्वात अनेक सीरिज लोकप्रिय होत आहेत. त्यातच एक म्हणजे 'बंदिश बँडिट्स' (Bandish Bandits). या सीरिजने रसिक-प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं. संगीतावर आधारित ही सीरिज आहे. यामध्ये शास्त्रीय संगीतासोबतच रॉक, पॉप संगीताचंही मिश्रण दाखवण्यात आलं आहे. यातील गाणी खूपच गाजत आहेत. संगीताचा वारसा असलेला घराणा आणि नवोदित संगीतकार यांच्यातील जुगलबंदी उत्कृष्टरित्या दाखवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजचा दुसरा सीझन आला. हाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला. तमन्ना शर्मा या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री श्रेया चौधरीनेही (Shreya Chaudhry) प्रेक्षकांचं मन जिकलं आहे. सीरिजनिमित्त श्रेयाने 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला.
'बंदिश बँडिट्स' सीरिजला एवढं यश मिळालं. कसं वाटतंय?
एक कलाकार यश मोजू शकत नाही. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून मी खरंच खूप खूश आहे. लोक मला मेसेज करत आहेत. माझ्यापर्यंत रिव्ह्यू पोहचवत आहेत. मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचते. लोकांना आवडतंय हेच खूप आहे. एका कलाकाराला असेच तर प्रेक्षक पाहिजे असतात. आणखी काय हवं? यासोबतच आम्ही हे यश एन्जॉय करत आहोत.
तिसरा सीझन कधी येणार?
तिसऱ्या सीझनसाठी तुमच्या इतकीच आम्हालाही प्रतीक्षा आहे. पण हे सगळं मेकर्सवरच अवलंबून आहे. संगीतावर आधारित सीरिज असल्याने काहीसा वेळ लागतो. आनंद तिवारी आणि अमृत पाल हेच आता याचं उत्तर देऊ शकतील. तिसरा सीझन कधी येणार हे मेकर्सच सांगू शकतील.
संगीतावर आधारित ही सीरिज आहे. ही प्रक्रिया कशी असते आणि या प्रक्रियेत कलाकार म्हणून तुम्ही कसे सहभागी होता?
हो, सीरिजचं मुख्य आकर्षण हे संगीत आहे. आनंद आणि अमृतने आम्हालाही त्यात सहभागी करुन घेतलं होतं. निकीता गांधीने माझ्यासाठी आवाज दिला आहे. तर ती जेव्हा रेकॉर्ड करायची मी तिथे जायचे. ती कशी गाते याचं निरीक्षण करायचे. आकाशदीप, सिद्धार्थ पंडित, आना रहमान, सिद्धार्थ माधवन यांनी गाणी कंपोज केली आहेत. तर ते आधी आम्हाला गाणी ऐकवायचे. कलाकार म्हणून नाही तर एक रसिक म्हणून तुम्ही ऐका असं ते आम्हाला सांगायचे. आमच्याकडून फीडबॅक घ्यायचे. त्यांनी खूपच अप्रतिम गाणी कंपोज केली. आम्हालाही ती गाणी अगदी सुरुवातीच्या स्टेजला जेव्हा की ते अजून तयारच नाही अशा पॉइंटला ऐकायला मिळत आहेत याचा आनंद व्हायचा. गाणं कसं बनतं हे आम्हाला जवळून बघायला मिळालं. हे सगळं मला भूमिका साकारण्यासाठीही गरजेचं होतं. कारण जशी सीरिजमध्ये तमन्ना म्युझिक स्कुलमध्ये गेली तसंच खऱ्या आयुष्यात मीही या माध्यमातून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. दोन महिने वर्कशॉप झालं. अक्षत पारेख हे आमचे कोच होते. त्यांनी पूर्ण टीम आणली होती. माझ्यासाठी व्होकल टीचर होते. मी कीबोर्डही शिकले. सगळ्यांसाठीच अशी वेगवेगळी ही टीम होती. त्यामुळे आमचा फेक परफॉर्मन्स नव्हता. आम्ही रियाज केला, वर्कशॉप केले. मेकर्सने आम्हाला प्रत्यक्षात सगळं काम करण्याची खूप छान संधी दिली. त्यामुळे मी त्यांची आभारी आहे.
संगीत आणि तुझं याआधी काही कनेक्शन होतं का?
म्युझिक माझ्यासाठी 'बेस्ट फ्रेंड' आहे. म्युझिक मला शांत राहायला मदत करतं. माझी आवडती प्लेलिस्टगही असते. सीरिजनंतर मी संगीताच्या आणखी प्रेमात पडले. प्रत्येक मूडसाठी गाणं आहे. आयुष्यात संगीताचं खूप महत्व असतं.आजकाल फ्यूजनचाही ट्रेंड आहे ते आपल्याला सीरिजमध्येही ऐकायला मिळतं. आजकाल तर मी सगळे बंदीश बँडिट्सची गाणी ऐकत असते.
अभिनेते अतुल कुलकर्णीही सीरिजमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?
अतुल सर म्हणचे अद्भूत कलाकार आहेत. मी नेहमीच त्यांचं काम बघत आले आहे. त्यांचं काम बघून प्रभावित झाले आहे. ते असा कलाकार आहेत ज्यांना पाहून आपणही आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. या सीरिजमुळे मला त्यांना सेटवर काम करताना पाहता आलं. बरंच काही शिकता आलं. ते भूमिकेसाठी कशी तयारी करतात हेही बघता आलं. इतकी वर्ष काम केल्यानंतर आता मला सगळं येतं असा त्यांचा अॅटिट्यूड दिसत नाही. ते खूप डेडिकेटेड आहेत. ती ऊर्जा काहीतरी वेगळीच असते. मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करायला नक्की आवडेल.
यानंतर तुझे आगामी प्रोजेक्ट्स कोणते आहेत?
मी मेहता बॉईजमध्ये या सिनेमात आहे. हा माझ्यासाठी खूप खास सिनेमा आहे. बोमन इरानी यांनी सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. ते या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. अलेक्झांडर सरांनीही सहलेखन केलं आहे. त्यांनी ऑस्कर विजेती फिल्म 'बर्डमॅन' लिहिली होती. वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित सिनेमा आहे. रिलेशनशिपवर बोलणारी कहाणी आहे ज्याच्याशी सगळेच कनेक्ट करतील. अनेक आंतरराष्ट्रीय सोहळ्यांमध्येही सिनेमाचा प्रीमियर झाला आहे. इम्तियाज अली, राजू हिरानी यांच्यासोबतही काम करायचं आहे. मराठीतही मला काम करायचं आहे.