नेटफ्लिक्सवर 'तस्करी' अन् हॉटस्टारवर 'चांद्रयान'; अमृता खानविलकरचा ओटीटीवर 'डबल धमाका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:51 IST2026-01-08T10:51:24+5:302026-01-08T10:51:47+5:30
जानेवारी महिना अमृता खानविलकरच्या नावावर! नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार एकाच वेळी गाजवणार मराठमोळी 'चंद्रमुखी'

नेटफ्लिक्सवर 'तस्करी' अन् हॉटस्टारवर 'चांद्रयान'; अमृता खानविलकरचा ओटीटीवर 'डबल धमाका'
Amruta Khanvilkar Upcoming Hindi Web Series : मराठमोळी 'चंद्रमुखी' अर्थात अमृता खानविलकर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनय, नृत्य आणि ग्लॅमरने तिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नव्या वर्षात अमृता हिंदी ओटीटी विश्वात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अमृतासाठी हा महिना अत्यंत खास असणार आहे. कारण एकापाठोपाठ एक तिच्या दोन मोठ्या हिंदी वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. एका बाजूला नेटफ्लिक्स आणि दुसऱ्या बाजूला डिस्ने प्लस हॉटस्टार अशा दोन दिग्गज प्लॅटफॉर्मवर अमृताचा 'डबल धमाका' पाहायला मिळणार आहे. तिच्या या नव्या सीरिजबद्दल चाहत्यांमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अमृताची पहिली बहुप्रतिक्षित सीरिज 'तस्करी: द स्मगलर्स वेब' ही १४ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये ती इम्रान हाश्मी, शरद केळकर आणि नंदिश संधू यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. तस्करीशी संबंधित टोळीशी दोन हात करणारी एक धमाकेदार भूमिका अमृताने यात साकारली आहे.
नेटफ्लिक्सनंतर अमृताचा जलवा जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या चांद्रयान मोहिमेवर आधारित 'स्पेस जेन- चांद्रयान' ही सीरिज २३ जानेवारीपासून स्ट्रीम होईल. 'टीव्हीएफ' निर्मित या सीरिजमध्ये अमृताने 'माधवी' हे महत्त्वाचे पात्र साकारले आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत नकुल मेहता, श्रीया सरन आणि प्रकाश बेलावडी यांसारखे कलाकार दिसणार आहेत. एकाच महिन्यात दोन आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकत असल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.