'आम्ही आरोपीला एका खोलीत बंद केलं, पण परत येईपर्यंत...'; सैफ अली खानवरील हल्ल्याची Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:22 IST2025-01-18T09:21:18+5:302025-01-18T09:22:21+5:30
Saif Ali Khan attack details: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्या त्या रात्री नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती एफआरआयमुळे समोर आली आहे.

'आम्ही आरोपीला एका खोलीत बंद केलं, पण परत येईपर्यंत...'; सैफ अली खानवरील हल्ल्याची Inside Story
Saif Ali Khan Attack FIR: सैफ अली खानवर हल्ला झाला. त्या रात्री नेमकं काय झालं. हल्लेखोराला सर्वात आधी कोणी बघितलं आणि सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्या घरात काय काय घडलं, याची माहिती एफआरआयमुळे समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एफआरआयनुसार, सैफ अली खान याचे कुटुंब सतगुरू शरण अपार्टमेंटमधील एका डुप्लेक्समध्ये राहते, जे वांद्रे भागात आहे. ११व्या आणि १२व्या मजल्यावर डुप्लेक्स आहे.
चोरासोबत झालेली झटापट आणि सैफ अली खानवर हल्ल्याची घटना ११व्या मजल्यावर घडली. ११व्या मजल्यावर तीन खोल्या आहेत. यातील एका खोलीत सैफ अली खान आणि करीना कपूर राहते. दुसऱ्या खोलीत तैमूर आणि त्याची आया गीता राहते. तिसऱ्या खोलीत जहांगीर आणि त्याची आया फिलिप आणि एक मदतनीस जुनू राहते.
१६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफ अली खानच्या घरात काय घडलं?
आया फिलिप हिने दिलेल्या तक्रारीनुसार एफआरआय नोंदवण्यात आला आहे. यात म्हटलं आहे की, १६ जानेवारी रोजी रात्री २ वाजता आवाज ऐकायला आला. त्यामुळे फिलिप यांची झोपमोड झाली.
"जाग आल्यानंतर मी बघितलं की, बाथरुमचा दरवाजा उघडा आहे आणि लाईटही सुरू आहेत. मला वाटलं की, करीना मॅडम मुलाला बघायला आल्या असतील. त्यानंतर मी झोपण्याचा प्रयत्न केला. पण, लगेच मला संशय आला. त्यामुळे मी उठले आणि बाथरुमपर्यंत गेले. मी जेव्हा डोकावून बाथरुममध्ये बघितले, तेव्हा आतून एक व्यक्ती बाहेर आला आणि जहांगीरच्या (सैफ अली खानचा छोटा मुलगा) बेडकडे जाऊ लागला."
"त्यामुळे मी धावतच जहांगीरच्या बेडकडे गेले. त्यावेळी हल्लेखोराने बोटानेच इशारा करत गप्प बसण्यास सांगितले. याच दरम्यान मदतनीस जुनूला जाग आली. त्यावेळी हल्लेखोराने तिलाही शांत बसण्यात सांगितले", असे फिर्यादीत फिलिप यांनी सांगितलं आहे.
हात हातात काठी आणि दुसऱ्या हातात होता चाकू
"मी जेव्हा जहांगीरला उठवू लागले, तेव्हा हल्लेखोरांने माझ्यावर चाकूने वार केला. माझ्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळ एका बोटावर चाकू लागला. मी त्याला विचारले की, तुला काय पाहिजे. तो म्हणाले पैशांची गरज आहे. मी विचारलं की, किती पैसे हवेत, तर तो म्हणाला एक कोटी", असे या एफआरआयमध्ये नमूद आहे.
जुनूने आवाज केला आणि सैफ अली खान धावत आला
"याचदरम्यान मदतनीस जुनू हिने आरडाओरड केली. त्यावेळी सैफ अली खान आणि करीना कपूर धावत जहांगीरच्या खोलीत आले. सैफ अली खान आला, त्यावेळी आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. मध्ये आलेल्या गीतावरही त्याने हल्ला केला. झटापट चालली. त्यानंतर सैफ अली खान आणि गीताने कसंतरी त्याला पकडलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरोपीला एका खोलीत बंद केलं", असे फिलिप यांनी सांगितले आहे.
"आरोपीला खोलीत बंद करून आम्ही डुप्लेक्सच्या १२व्या मजल्यावर गेलो. काही वेळाने आम्ही ११व्या मजल्यावर ज्या खोलीत आरोपीला बंद केले होते, तिथे आलो. दरवाजा उघडून बघितला तर आरोपी तिथून पळून गेला होता. हल्लेखोराचे वय ३० ते ३५ वर्षादरम्यान होते. त्याने काळी पॅन्ट, शर्ट आणि डोक्यावर टोपी घातलेली होती", अशी माहिती एफआयआरमधून समोर आली आहे.