बॉक्स आॅफिसला प्रतीक्षा हिटची
By Admin | Updated: November 10, 2015 02:15 IST2015-11-10T02:15:27+5:302015-11-10T02:15:27+5:30
गेल्या दोन आठवड्यांत चित्रपटगृहांत झळकलेले चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटले आहेत. त्यामुळे बॉक्स आॅफिसला एखाद्या हिट चित्रपटाची गरज आहे

बॉक्स आॅफिसला प्रतीक्षा हिटची
गेल्या दोन आठवड्यांत चित्रपटगृहांत झळकलेले चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटले आहेत. त्यामुळे बॉक्स आॅफिसला एखाद्या हिट चित्रपटाची गरज आहे. दिवाळीनिमित्त या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’वर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. सूरज बडजात्या आणखी एकदा सलमान खानला आपल्या प्रेमच्या नव्या अवतारात पडद्यावर आणत आहेत. त्याच्यासोबत राजकन्येच्या रूपात येत आहे सोनम कपूर. सहायकांच्या भूमिका नितीन मुकेश, स्वरा भास्कर, अरमान कोहली आणि अनुपम खेर यांनी साकारल्या आहेत.
सूरज बडजात्या व सलमान खान यांचे ऋणानुबंध १९८९ पासून आहेत. त्या वर्षी राजश्री प्रोडक्शनने ‘मैने प्यार किया’ तयार केला होता. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर सूरज-सलमान या जोडीने ‘हम आपके हैं कौन’च्या रूपाने यशाचे शिखर गाठले. शिवाय १९९९ मध्ये आलेल्या ‘हम साथ साथ है’ने यश मिळविले होतेच. १६ वर्षांनंतर सूरज-सलमान ही जोडी ‘प्रेम रतन धन पायो’चे सगळ्यात मोठे आकर्षण मानले जात आहे.
राजघराण्यांच्या कथेला घेऊन बनविलेल्या या चित्रपटाच्या भव्यतेमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. बजेटच्या बाबतीतही हात आखडता घेतलेला नाही. ‘प्रेम रतन धन पायो’चा खर्च १०० कोटी रुपयांच्याही पुढचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राजश्रीच्या इतिहासात हा सगळ्यात महाग/खर्चीक चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे मार्केटिंग आणि प्रमोशनच्याही नव्या योजना बनविण्यात आल्या आहेत. स्वत: सलमान खान आणि सोनम कपूरने प्रमोशनसाठी कोणतेही प्रयत्न करायचे शिल्लक ठेवले नाही. चित्रपट क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार हा चित्रपट पाच हजार प्रिंट्सने प्रदर्शित केला जात आहे. या आकड्यांचा विचार केला तर हा चित्रपट सलमान खानचा सगळ्यात मोठा चित्रपट मानले जात आहे. चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या दिवशी चित्रपटाला ५० ते ६० कोटी रुपयांची ओपनिंग मिळू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामुळे चित्रपटाला चार दिवसांचा वीकेंड मिळेल व दिवाळी सुट्यांचाही फायदा चांगला मिळेल. पूर्वानुमानानुसार पहिल्या दोन ते तीन दिवसांत चित्रपट १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये दाखल होईल व पहिल्या वीकेंडमध्ये गल्ला १२० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जाणकारांचे म्हणणे असे की चित्रपटाचे पहिले लक्ष्य आहे ते ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये जायचे. प्रेमच्या या चौथ्या अवतारात सलमान खान कौटुंबिक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयात किती स्थान मिळवतो हे लवकरच समजेल.