चित्रपटांना रंजक बनविणारे व्हिज्युएल इफेक्ट्स
By Admin | Updated: July 10, 2015 00:11 IST2015-07-10T00:11:09+5:302015-07-10T00:11:09+5:30
सलमान खानचा किक चित्रपट आठवत असेल. सलमान खास ड्रेसमध्ये रेल्वेसमोरुन अगदी सहज चालत जातो. अचाट वाटणारा हा सीन पाहून अनेकांच्या

चित्रपटांना रंजक बनविणारे व्हिज्युएल इफेक्ट्स
सलमान खानचा किक चित्रपट आठवत असेल. सलमान खास ड्रेसमध्ये रेल्वेसमोरुन अगदी सहज चालत जातो. अचाट वाटणारा हा सीन पाहून अनेकांच्या तोंडात बोटं जातात. कसं शक्य आहे हे? असं करणं म्हणजे थेट मृत्यूलाच आमंत्रण देणं आहे. मात्र यामागील तंत्रज्ञान पाहिल्यानंतर आपणाला त्याची कल्पना येईल. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात पडद्यावर आणल्या जातात त्या व्हीएफएक्स शॉटस् (व्हिज्युएल इफेक्टस्) द्वारे.
हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये असे इफेक्टस् मोठ्या प्रमाणावर दाखविले जातात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ज्युरासिक वर्ल्डमध्ये पडद्यावर धावणारे आणि जोरजोरात ओरडणारे डायनॉसोरस पाहिल्यानंतर आपणास त्याची जाणीव होते. द अॅव्हेंजर्स, गेम आॅफ थ्रोन, लाईफ आॅफ पाय, ग्रॅव्हिटी, गुड डे टू डाय, रोबोकॉप हे चित्रपट अंगावर शहारे आणतात. अत्यंत भन्नाट अशा कल्पना साकारण्याचे काम या तंत्रज्ञानानं केलंय. बॉलिवूड चित्रपटांमध्येही धूम थ्री, क्रिश-३, रा-वन, जोधा अकबर, बाल हनुमान, शिवाजी: द बॉस, दशावतारमला अशा व्हीएफएक्स शॉटस्नी बॉक्स आॅफिसवर गर्दी मिळवून दिली.
तंत्रज्ञानाच्या डोळे दीपविणाऱ्या प्रगतीची छाया हिंदी चित्रपटांवरही पडली अन् तोंडात बोट घालायला लावणाऱ्या अचाट दृश्यांनी सिनेमाची पारंपरिक चौकटच बदलून टाकली. आज अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये व्हिज्युएल इफेक्टसचा वापर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी दृश्ये साकारली जात आहेत. सध्या अशाच व्हिज्युएल इफेक्टसची चर्चा जोरात सुरू आहे. त्याचे कारण आगामी बाहुबली हा चित्रपट आहे. या आधी आलेल्या याच क्रमातील चित्रपटांनीही मोठी प्रसिद्धी मिळवली होती. त्याचीही या निमित्ताने चर्चा होत आहे.