‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’च्या टीमची लोकमत आॅफिसला भेट
By Admin | Updated: July 30, 2016 04:08 IST2016-07-30T04:08:27+5:302016-07-30T04:08:27+5:30
एकटेपणावर भाष्य करणारा ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ हा चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. आयुष्यात येणाऱ्या एकटेपणाने डिप्रेस न होता त्यातून मार्ग कसा काढायचा, याची एक अनोखी

‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’च्या टीमची लोकमत आॅफिसला भेट
एकटेपणावर भाष्य करणारा ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ हा चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला. आयुष्यात येणाऱ्या एकटेपणाने डिप्रेस न होता त्यातून मार्ग कसा काढायचा, याची एक अनोखी कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, मंगेश देसाई, मोहन आगाशे व दिग्दर्शक ऋतुराज धलगडे या सर्वांनी नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली व या चित्रपटाविषयी अनेक पैलू उलगडले.
आपल्या व्यक्तिरेखेविषयी मोहन आगाशे म्हणाले, ‘‘मी यामध्ये श्रीरंगकाकाची भूमिका साकारतो आहे. सिद्धार्थ जो ए.एल.पी. गु्रप चालवत असतो, त्याचे मी गिऱ्हाईक बनतो. ये भी दिन जायेंगे. ये नहीं तो और सही... असे मानणारी माझी भूमिका आहे.’’ तर मंगेश म्हणाला, ‘‘या चित्रपटात मी माझे कुटुंब गमावलेले आहे. मला कोणी नातेवाईक नसल्याने माझ्या आयुष्यात एकटेपणा आहे. हाच एकटेपणा मी माझ्या खऱ्या आयुष्यातही अनुभवलेला आहे. मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो, तेव्हा आमदार निवासात राहायचो. माझे तेव्हा कोणीच नव्हते. त्या वेळी या एकटेपणाचा मी चांगलाच अनुभव घेतलाय.’’
सिद्धार्थ म्हणतो, ‘‘हा चित्रपट जरी एकटेपणावर असला, तरी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधीच एकटेपणाला सामोरा गेलो नाहीये. मला मुळातच एकटं राहायची भीती वाटते. मी खूप बोलका आहे; त्यामुळे सगळ्यांशीच पटकन माझं ट्युनिंग जमतं.’’ तर स्पृहा म्हणाली, ‘‘एकटेपणा हा विषय जरी गंभीर असला, तरी तो आम्ही खूपच इंटरेस्टिंगली मांडलाय. ही एक हलकीफुलकी लव्ह स्टोरी आहे.’’
दिग्दर्शक ऋतुराज धलगडे चित्रपटाच्या कथेविषयी म्हणाले, ‘‘मला मानसिक स्वास्थ्य हा विषय घेऊन चित्रपट करायचाच होता. त्यासाठी मी दोन-तीन कथादेखील लिहिल्या, पण त्या काही चांगल्या जमत नव्हत्या. एकटेपणावर आधारित हा विषय समोर आला आणि यातून काही तरी चांगला विषय मांडता येईल, असे वाटले. एवढेच नाही, तर आज शहरी जीवनामुळेदेखील एकटेपणा वाढतोय. यावर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. आपण एकांतातून कसा मार्ग काढू शक तो, हे आम्ही हलक्याफुलक्या अंदाजात सांगितले आहे.’’