"बायको पुढे जातेय म्हणून…" विशाखा सुभेदारची पतीसाठी पोस्ट, लग्नाला २७ वर्षे पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 09:14 IST2025-06-02T09:11:16+5:302025-06-02T09:14:15+5:30
विशाखाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

"बायको पुढे जातेय म्हणून…" विशाखा सुभेदारची पतीसाठी पोस्ट, लग्नाला २७ वर्षे पूर्ण!
मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ( Vishakha Subhedar ) ओळखलं जातं. गेली कित्येक वर्ष तिने विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विशाखा सुभेदार आपल्या खासगी आयुष्याबाबत क्वचितच बोलते. आपल्या वैवाहिक आयुष्याला २७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तिने पतीसाठी एक खास आणि हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. "बायको पुढे जातेय म्हणून कधीही तुझ्यातला पुरुषी अहम जागा नाही होऊ दिलास" अशा शब्दांत तिने पतीच्या समजूतदारपणाचं आणि पाठबळाचं कौतुक केलं आहे. विशाखाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
विशाखाने शेअर केलेली एक खास पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिनं पतीचा फोटो पोस्ट करत लिहलं, "सोबत, साथ, जीवनप्रवासाची २७ वर्षे…! प्रचंड खडतर प्रवास, कधी तू कुठे, मी कुठे… आणि अगदी आजही तेच, पण तरीही तू आहेस आणि मी ही!ही भावना कायम…! भांडणं झाली, रुसवेफुगवे, चढउतार, काटकसर, पैसा उधळ त्यावरून वचवच, स्कूटर ते फोर व्हिलर…! सगळंच तुझ्या साथीने…Thank u Mahesh Subhedar सगळ्यासाठी…"
पुढे तिनं लिहलं, "एक मात्र प्रांजळपणे कबूल करते कायमच… बायको पुढे जातेय म्हणून कधीही तुझ्यातला पुरुषी अहम जागा होऊ दिलास नाही…नवरा म्हणून मला सपोर्ट केलास, पाठीशी उभा राहिलास. माझी प्रत्येक गोष्ट मी तुला सांगते.. कारण, तू माझा आधी मित्र आहेस आणि नंतर नवरा… बाबा राहूच सोबत मरेपर्यंत..! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मह्या", या शब्दात त्यांनी नवऱ्यावरील प्रेम व्यक्त केलं. विशाखा सुभेदारच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विशाखां १९९८ मध्ये महेश सुभेदार यांच्याशी लग्न केलं होतं. कलाविश्वात काम करताना कुटुंबीयांची सुद्धा साथ महत्त्वाची असते. विशाखाला या सगळ्या प्रवासात तिच्या पतीने खंबीरपणे पाठिंबा दिला. विशाखा सोशल मीडियावर सुद्धा कायम सक्रिय असते. विविध गोष्टी ती आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाष्य करते.