छोट्या पडद्यावर वैदर्भीय भाषेचा लहेजा!
By Admin | Updated: September 25, 2016 03:36 IST2016-09-25T03:36:42+5:302016-09-25T03:36:42+5:30
सध्या वेगळ्या विदर्भाचा मुद्दा राज्यात गाजतोय. वेगळ्या विदर्भासाठी आंदोलने केली जात आहेत. मालिका आणि सिनेमा समाजमनाचा आरसा असतो असे म्हणतात. आता हा योगायोगच

छोट्या पडद्यावर वैदर्भीय भाषेचा लहेजा!
सध्या वेगळ्या विदर्भाचा मुद्दा राज्यात गाजतोय. वेगळ्या विदर्भासाठी आंदोलने केली जात आहेत. मालिका आणि सिनेमा समाजमनाचा आरसा असतो असे म्हणतात. आता हा योगायोगच म्हणावा लागेल, की छोट्या पडद्यावरही सध्या वैदर्भीय वऱ्हाडी भाषेचा बोलबाला पाहायला मिळतोय. विविध मालिकांमध्ये विदर्भातील प्रसिद्ध वऱ्हाडी भाषेचा वापर होत असल्याचे दिसते आहे...
काही दिवसांपूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकांच्या भेटीला आलीय. मालिकेची कथा आणि पात्रांमुळे अल्पावधीतच ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरू लागलीय. या मालिकेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेतील वैदर्भीय भाषेचा वापर. या मालिकेत अभिजित खांडकेकर हा गुरुनाथ ही भूमिका साकारतोय, तर याच मालिकेत त्याची पत्नी राधिकाची भूमिका अनिता दाते साकारतेय. मालिकेत अनिता ही विदर्भातली दाखवण्यात आलीय. त्यामुळं तिचे संवादही वैदर्भीय लहेजातले आहेत. राधिकाचा वऱ्हाडी अंदाज रसिकांना चांगलाच भावतोय.
‘चला हवा येऊ द्या’ हा कॉमेडी शो सध्या महाराष्ट्रावर गारुड घालतोय. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांना भावते. या व्यक्तिरेखांपैकी एक म्हणजे भारत गणेशपुरे. भारत गणेशपुरेचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावतोय.
या शोमध्ये भारत गणेशपुरेचं वैशिष्ट्य म्हणजे तो कोणतीही भूमिका साकारत असला तरी त्याच्या बोलण्यात आढळणारा वैदर्भीय भाषेचा लहेजा. विदर्भाची प्रसिद्ध वऱ्हाडी भाषा भारत गणेशपुरेनं आपल्या अनोख्या अंदाजाने प्रसिद्ध केलीय. या वैदर्भीय लहेजामुळे भारत गणेशपुरेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. त्याचा हा अंदाज रसिकांचं मनोरंजन करतोय.
काही दिवसांपूर्वीच झी युवा वाहिनीवर सुरू झालेल्या लव, लग्न, लोचा या मालिकेतही वैदर्भीय भाषेची झलक पाहायला मिळतेय. या मालिकेत सक्षम कुलकर्णी साकारत असलेली भूमिका आणि त्याचे आई-वडिलसुद्धा विदर्भातले दाखवण्यात आलेत. त्यांचे-त्यांचे संवादही वैदर्भीय वऱ्हाडी भाषेतले आहेत. वऱ्हाडी भाषा, त्यातील गोडवा रसिकांना चांगलाच भावतोय. भाषा कोणतीही असली तरी रसिकांपर्यंत ती पोहोचणे गरजेचे असते. याआधीही मराठीसह मालवणी भाषेतल्या संवादांनी मालिका हिट ठरल्या होत्या. विदर्भाच्या मुद्यावरून राजकारण रंगत असलं तरी वैदर्भीय भाषेचा गोडवा रसिकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलाय. छोट्या पडद्यावरील हा वैदर्भीय अंदाज रसिकांच्या काळजाला भिडतोय.
- suvarna.jain@lokmat.com