विद्या बालन पोहोचली पोलीस ठाण्यात, अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल केली FIR; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:36 AM2024-02-21T11:36:44+5:302024-02-21T11:37:59+5:30
विद्या बालनच्या डोक्याला ताप, जवळच्या व्यक्तींसोबत झाला फसवणुकीचा प्रकार; नक्की झालं काय?
अभिनेत्री विद्या बालनचे (Vidya Balan) लाखो चाहते आहेत. तिने आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं आहे. सोशल मीडियावरही तिचे मिलियन फॉलोअर्स आहेत. सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. विद्या बालनही याला बळी पडली आहे. एका व्यक्तीने विद्याचे बनावट अकाऊंट तयार करुन त्याचा गैरवापर केला आहे. याविरोधात विद्याने FIR दाखल केली आहे.
आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे बनावट अकाऊंट सुरु करणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. बॉलिवूड तारे तारकांच्या नावाने तर अनेक सोशल मीडिया अकाऊंट अस्तित्वात आहेत. काही दिवसांपूर्वी एका अज्ञात माणसाने विद्याचं बनावट इन्स्टाग्राम आणि जीमेल अकाऊंट सुरु केलं. हा अज्ञात व्यक्ती 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी विद्या बनून लोकांच्या संपर्कात होता. हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा इंडस्ट्रीतील एका ओळखीतल्या व्यक्तीने विद्याला याबद्दल जागरुक केलं. त्या अज्ञात माणसाने आपण विद्या असल्याचा दावा करत व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला.सोबतच त्याने काम देण्याचंही आमिष दाखवलं. जेव्हा विद्याला याबद्दल समजलं तेव्हा तिने आपण कोणालाही संपर्क केला नसल्याचं सांगितलं. तसेच ज्या नंबरवरुन तो मेसेज करण्यात आला आहे तो नंबरही आपला नसल्याचं विद्याने स्पष्ट केलं.
विद्याने तातडीने त्या अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत एफआयआर (FIR) दाखल केली. सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी तिने आपली मॅनेजर आदिती संधूच्या मार्फत खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बनावट इन्स्टाग्राम आणि जीमेल अकाऊंट बनवल्याप्रकरणी आणि लोकांना चुकीची माहिती देऊन फसवल्याप्रकरणी तिने ही तक्रार केली.