Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:34 IST2025-11-03T17:33:35+5:302025-11-03T17:34:10+5:30
Veteran Actress Daya Dongre Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं नुकतंच निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
Daya Dongre Death: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं नुकतंच निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं होतं. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्कृष्ट गायिका देखील होत्या. सुरुवातीला त्यांना गायन क्षेत्रातच आपले करिअर करायचे होते. यासाठी त्यांनी शालेय जीवनापासूनच शास्त्रीय तसेच नाट्यसंगीताचे धडे गिरविले होते. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांनी पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. यामुळे त्यांचा ओढा अभिनयाकडे वाढला आणि दुर्दैवाने त्यांचे गाणे मागे पडले. अभिनयाची आवड निर्माण झाल्यानंतर, नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून शिक्षण घेण्यासाठी दिल्लीत गेल्या होत्या. शिक्षण सुरू असतानाच त्यांच्यावर संसाराची जबाबदारी येऊन पडली. लग्नानंतर त्यांचे पती शरद डोंगरे यांनी त्यांच्या कलेच्या आवडीला खंबीर साथ दिली.
वर्कफ्रंट
दया डोंगरे यांनी विविध चित्रपट, नाटके आणि मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरील गजरा मालिकेतून दया डोंगरे लोकप्रिय झाल्या. नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून, नकाब, लालची, चार दिवस सासूचे, कुलदीपक या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खाष्ट सासूची भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडली. याशिवाय तुझी माझी जमली जोडी रे, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी या मालिकांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठी सोबतच आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत कि जंग या हिंदी सिनेमांतही त्यांनी काम केलं.