"कुणी मंत्री असो वा श्रीमंताने माजलेलं घराणं...", वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:21 IST2025-05-23T11:21:01+5:302025-05-23T11:21:20+5:30
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. राजकारणातील नेते मंडळींसोबतच मनोरंजन विश्वातील कलाकारही यावर सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत.

"कुणी मंत्री असो वा श्रीमंताने माजलेलं घराणं...", वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतप्त
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून वैष्णवीने १६ मे रोजी आत्महत्या करत जीवन संपवलं. प्रतिष्ठित आणि राजकीय घराणे असलेल्या हगवणे कुटुंबीयांकडून अशा प्रकारच्या कृत्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. राजकारणातील नेते मंडळींसोबतच मनोरंजन विश्वातील कलाकारही यावर सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत.
मराठी अभिनेता संकेत कोर्लेकर यानेदेखील इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "माननीय सरकार, हुंड्यामुळे आजही जीव जात आहेत. कुणी मंत्री असो वा श्रीमंतीने माजलेलं घराणं...कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे दाखवून देण्याची आणि याआधी तुमच्याकडून न्याय न मिळालेल्यांना किमान समाधान मिळवून देण्याची ही योग्य वेळ आहे. आजही हुंड्यामुळे अनेक बळी जात असतील पण आपल्यापर्यंत तोच बळी पोहोचतो जो प्रसिद्धीच्या झोतात असेल", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "हुंड्यामुळे एका तान्ह्या बाळाची आई हे जग सोडून जाते आणि तिचा जीव घेणाऱ्यांवर ठोस गुन्हा होत नाहीये ही खूप वाईट गोष्ट आहे. हुंडा घेणे आणि त्यासाठी छळ करणे ही मानसिकता मुळातून नष्ट होईल अशी शिक्षा व्हावी हीच मी सरकारकडून अपेक्षा करतो. त्या लहानश्या मुलाचे भविष्य त्याच्या दिवगंत आईच्या पश्चात उज्वल व्हावे हीच प्रार्थना. एक कलाकार म्हणून मी ह्या कृत्याचा निषेध करतो".