'रंगीला'चा रिमेक येणार? उर्मिला मातोंडकरने दिली प्रतिक्रिया; साकारलेली 'मिली' ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:09 IST2025-12-01T15:09:03+5:302025-12-01T15:09:44+5:30
कोणाला रिमेक बनवायचा असेल तर..., काय म्हणाली उर्मिला?

'रंगीला'चा रिमेक येणार? उर्मिला मातोंडकरने दिली प्रतिक्रिया; साकारलेली 'मिली' ही भूमिका
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बऱ्याच काळापासून स्क्रीनवर दिसलेली नाही. एकेकाळची ती आघाडीची अभिनेत्री होती. 'रंगीला' हा उर्मिलाच्या करिअरमधला सुपरहिट सिनेमा होता. आमिर खानसोबत तिची जोडी झळकली होती. आजही सिनेमातील तिच्या अभिनयाचं आणि डान्सचं कौतुक होतं. दरम्यान अनेकदा 'रंगीला'च्या सीक्वेलची चर्चा होते. उर्मिलाने नुकतीच यावर प्रतिक्रिया दिली.
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाली, "हा सिनेमा रिलीज झाला आणि काळ जणू काय थांबलाच होता. असे खूप कमी सिनेमे असतात जे लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करतात. आजही एअरपोर्टरवर किंवा इतर कुठेही लोक मला मिली नावाने हाक मारतात. माझ्या भूमिकेचं हे नाव आजही सगळ्यांच्या लक्षात आहे हे खरोखरंच कमाल आहे."
सिनेमाच्या रीमेकविषयी विचारताच उर्मिला म्हणाली, "ज्याची त्याची मर्जी आहे. जर कोणाला वाटत असेल की त्यांनी रिमेक करावा. मी काय बोलू? सिनेमा कधीच कोणा एकाचा नसतो. एकदा सिनेमा रिलीज झाला की तो तुमचा राहत नाही. या काही वर्षात मला एक समजलं की जो सिनेमा मी केला तो ज्याने पाहिला त्या प्रत्येकाचा आहे. मी ती भूमिका केली आणि सिनेमा स्क्रीनवर आला तेव्हाच स्क्रीनवर दिसत असलेल्या त्या मुलीपासून मी वेगळी झाले. त्यामुळेच आपल्या जुन्या भूमिकांबद्दल पजेसिव्ह असणं किंवा त्यावर अधिकार गाजवणं जरा बालिश आणि वेडेपणाचं वाटतं. जर कोणाला रिमेक करायचा असेल तर त्यांनी तो करावा, का नाही? जितके जास्त लोक करतील तितकी मजा येईल. सिनेमा कसा बनेल हे प्रेक्षक ठरवतील. माझ्याकडून तर नेहमीच हे स्वागतार्ह आहे."
'रंगीला' थिएटर्समध्ये पुन्हा रिलीज झाला आहे. सिनेमात आमिर खान, उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफची भूमिका आहे. सिनेमातील गाणी, आमिरचे डायलॉग आणि स्टाईल, उर्मिलाचं सौंदर्य आणि अभिनय, जॅकी-उर्मिलाची केमिस्ट्री या सगळ्याच गोष्टींमुळे सिनेमा तुफान गाजला.