'कबाली'चा प्रमोशनचा अनोखा फंडा, विमानावर रंगवले पोस्टर
By Admin | Updated: June 30, 2016 15:55 IST2016-06-30T15:52:00+5:302016-06-30T15:55:25+5:30
अभिनेते रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनोखा फंडा वापरण्यात आला असून एका विमानावर चित्रपटाचे पोस्टर रंगवण्यात आले आहे.

'कबाली'चा प्रमोशनचा अनोखा फंडा, विमानावर रंगवले पोस्टर
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ३० - दक्षिणेत देव मानले जाणारे अभिनेते रजनीकांत यांचे करोडो चाहते असून त्यांच्यासाठी ते अनेक गोष्टी करतात. त्यांच्या चित्रपटाच्या पहिल्या शोपासूनच प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असल्याने त्यासाठी वेगळ्या प्रमोशनची गरजच भासत नाही. मात्र त्यांच्या आगामी 'कबाली' या तामिळ चित्रपटासाठी प्रमोशनचा एक अनोखा फंडा वापरण्यात येत असून प्रमोशनसाठी एक खास विमान तयार करण्यात आले आहे. एअर एशिया कंपनीच्या एका विमानावर चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले असून त्यामध्ये मोठ्या आकारात रजनीकांत यांचा या चित्रपटातील लूक रंगवण्यात आला आहे. तसेच कबाली हे चित्रपटाचे नावही काढण्यात आले आहे. या हटके प्रमोशनमुळे विमानतळावरील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा चित्रपट येत्या १५ जुलैला प्रदर्शित होणार आहे, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपट प्रदर्शनाची तारीख (२२ जुलै) पुढे जाऊ शकते. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच या विमानाचे उड्डाण होणार असून फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी रजनीकांत यांच्या काही चाहत्यांना या विशेष विमानातून बेंगळुरू येथून चेन्नईला नेण्यात येणार असल्याचे समजते. तसेच नवी दिल्ली, गोवा, पुणे व कोच्ची येथूनही अशा काही विमानांचे उड्डाण होणार असल्याचे समजते.
या चित्रपटात अभिनेत्री राधिक आपटे रजनीकांत यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.