‘मराठी रंगभूमीला परंपरा अन् इतिहास’

By Admin | Published: March 5, 2017 03:43 AM2017-03-05T03:43:56+5:302017-03-05T03:43:56+5:30

‘रमा माधव’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता आलोक यादव याचे नाव ‘फोर्ब्स’ इंडियाच्या यादीत आले आहे.

'Tradition and History of Marathi theater' | ‘मराठी रंगभूमीला परंपरा अन् इतिहास’

‘मराठी रंगभूमीला परंपरा अन् इतिहास’

googlenewsNext

- Team Cnx

‘रमा माधव’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेता आलोक यादव याचे नाव ‘फोर्ब्स’ इंडियाच्या यादीत आले आहे. या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशियाच्या यादीमध्ये आलोकचे नाव आहे. साहजिकच त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसला नाही तर नवलच. यानिमित्ताने त्याचा एकूणच प्रवास आणि नाटकांविषयी त्याला वाटणाऱ्या भावना यासंदर्भात लोकमत सीएनएक्सने साधलेला संवाद...

१. फोर्ब्स या मासिकाच्या यादीत तुझी निवड झाली, याविषयी काय सांगशील?
- माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. माझी निवड या मासिकासाठी झाली आहे. लहानपणापासून मला नाटकाची आवड होती. आजपर्यंत मी खूप सारी नाटके केली. त्याचबरोबर काही नाटकाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. आज या क्षणामुळे आपल्या मेहनतीचे फळ मिळाले असे वाटते. त्याचबरोबर आजपर्यंत ज्या लोकांसोबत काम केले, त्या सर्वांचा यामध्ये हातभार आहे.

२. नावाचा समावेश झाल्याने जबाबदारी आली असे वाटते का?
- ही आनंदाची गोष्ट असली तरी, ही एक जबाबदारी वगैरे काही वाटत नाही. मात्र, ही निवड होण्यापूर्वी जे काम करत होतो तेच काम प्रामाणिकपणे पार पाडेन. फक्त माझ्या प्रवासातील हा एक टप्पा आहे, असे वाटते. सध्या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून जे काम सुरू आहे ते प्रेमाने आणि मनापासून करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

३. तू कित्येक नाटकाच्या माध्यमातून अभिनयाची चुणूक दाखविली आहे, तर रंगभूमीविषयी काय सांगशील?
- मराठी रंगभूमीला खूप मोठी परंपरा आणि इतिहास आहे. या क्षेत्रात सध्या खूप नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यात पुणे हे प्रायोगिक नाटक करण्याचे हक्काचे केंद्र आहे. कारण इथे खूप प्रायोगिक नाटके होतात. तसेच नाटकाला फार सामग्री लागत नाही. उत्तम स्क्रीप्ट आणि नट यावर आधारितही चांगले नाटक होऊ शकते. हा विचार करता, संपूर्ण महाराष्ट्रात हे नाटकाचे वारे पसरावे असे वाटते. तसेच लोकांनी नाटक हे माध्यम गांभीर्याने घेऊन त्याचा प्रसार करणे आवश्यक आहे.

४. नाटकानंतर भविष्यात चित्रपट दिग्दर्शन करण्याचा विचार आहे का?
- होय, मी नाटक दिग्दर्शन केले आहे. चित्रपट दिग्दर्शनासाठी विचार सुरू आहे. त्यासाठी डोक्यामध्ये काही गोष्टीदेखील ठरल्या आहेत. पाहुयात काय होते. कारण दिग्दर्शन करणे ही खूप मोठी जबाबदारी असते. पण योग्य वेळ आली, की याविषयी नक्कीच सांगेन.

५. नाटक आणि चित्रपट यामध्ये तुझ्यासाठी जास्त काय आव्हानात्मक आहे?
- माझ्यासाठी नाटक, चित्रपट या गोष्टी करणे आव्हानात्मक आहे. कारण कोणतीही गोष्ट सातत्याने करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. त्यामुळे मला ज्या संधी मिळत असतात. त्या संधीला शंभर टक्के देण्याचा माझा प्रयत्न असतो.

 

Web Title: 'Tradition and History of Marathi theater'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.