बरेचसे गोड, थोडेसे अळणी

By Admin | Updated: June 14, 2015 00:46 IST2015-06-14T00:46:47+5:302015-06-14T00:46:47+5:30

कलावंतांची मजबूत फळी हाताशी असली, चित्रपटाचा लूक फ्रेश असला, सोबतीला लक्षवेधी लोकेशन्स असली तरी चित्रपटाची भट्टी हमखास जुळून येईलच असे काही सांगता येत नाही.

Too Much Sweet, Little Angle | बरेचसे गोड, थोडेसे अळणी

बरेचसे गोड, थोडेसे अळणी

- राज चिंचणकर

कलावंतांची मजबूत फळी हाताशी असली, चित्रपटाचा लूक फ्रेश असला, सोबतीला लक्षवेधी लोकेशन्स असली तरी चित्रपटाची भट्टी हमखास जुळून येईलच असे काही सांगता येत नाही. कारण हे सगळे हाती असले, तरी त्यासाठी चित्रपटाची कथा, पटकथा ठोस असावी लागते आणि त्यावर दिग्दर्शकाचा तेवढाच दमदार हात फिरावा लागतो. ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हा चित्रपट वेगळ्या धाटणीची गोष्ट सांगत असला, तरी तो पटकथेत रेंगाळला आहे. हा चित्रपट सादर करण्यातला प्रामाणिकपणा जरी स्पष्ट दिसून येत असला, तरी या शुगर व सॉल्टचे प्रेम बरेचसे गोड, पण थोडेसे अळणी अशा चवीपुरते मर्यादित राहिले आहे.
या चित्रपटात नात्यांचा गोतावळा आहे; त्याहीपेक्षा यात प्रमुख व्यक्तिरेखांच्या तीन जोड्या आहेत. या सर्वांभोवती ही गोष्ट फिरत राहते. राहुल व अदिती हे दोघे पती-पत्नी आर्थिक क्षेत्रात नाव मिळवलेले आहेत आणि त्यांनी ओम या मुलाला दत्तक घेतले आहे. पण ओम आॅटिझमग्रस्त असल्याचे निष्पन्न होताच राहुलने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. पण अदितीने ओम आणि होम यात स्वत:ला गुंतवून घेतले आहे. दुसरीकडे अजय हा एक व्यावसायिक; तर त्याची बायको अनन्या ही सामाजिक
कार्यात रस घेणारी आहे. अजयला तिचे हे उद्योग अजिबात पटत
नसल्याने त्यांच्यात थोडा तणाव
आहे.
यातील तिसरी जोडी म्हणजे रवींद्र आणि सौम्या यांची आहे. रवींद्र हा रोबोटिक खुर्चीच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे आणि ते त्याचे स्वप्न आहे. याच प्रोजेक्टच्या माध्यमातून या जोड्यांमधल्या तिघी जणी एकमेकांशी जोडल्या जातात आणि त्यातून त्यांच्या कौटुंबिक नात्यांचीही नव्याने ओळख पटत जाते, असा या गोष्टीचा सारांश आहे.
कथा, पटकथा, दिग्दर्शन अशी जबाबदारी सांभाळलेल्या सोनाली बंगेरा यांनी यातून एका वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटाची संकल्पना मांडली आहे खरी; परंतु या संकल्पनेचे विश्व आकुंचन पावल्याचे जाणवते. वेळ आल्यास स्त्रीशक्ती काय करू शकते, याचा आलेख वास्तविक
त्यांना या गोष्टीतून मांडायचा आहे; परंतु हा आलेख उंचावत जाण्याऐवजी सरळ रेषेत वाटचाल करताना
दिसतो.
कथेच्या अनुषंगाने स्त्रीशक्तीचा आविष्कार यातून अधिक जोमाने दिसायला हवा होता. या तिघींचे मिशन सहजतेने साध्य होताना दिसते. यातील काही प्रसंग त्यांच्यावर बेतलेले जाणवतात; मात्र यातल्या खलनायकरूपी बॉसचा खलनायकीपणा भिडत नाही. कथा-पटकथेपेक्षा दिग्दर्शक म्हणून सोनाली बंगेरा यांची कामगिरी उजवी म्हणावी लागेल. त्यादृष्टीने चित्रपटाचे बांधकाम आश्वासक आहे. चित्रपटाला देण्यात आलेली एकूण ट्रीटमेंट चांगली असल्याने तो पडद्यावर दिसतो मात्र उत्तम.
सर्वच कलावंतांच्या अभिनयातला ताजेपणा हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सोनाली कुलकर्णी (अदिती), समीर धर्माधिकारी (राहुल), अजिंक्य देव (अजय), शिल्पा तुळसकर (अनन्या), प्रसाद ओक (रवींद्र), क्रांती रेडकर (सौम्या) यांच्यासह यतीन कार्येकर, जयवंत वाडकर या सगळ्या कलाकारांनी त्यांच्या भूमिका चोख केल्या आहेत. सोनाली कुलकर्णीचा ग्रेसफुल वावर चित्रपटाच्या प्रसन्नतेत भर घालतो. तिन्ही अभिनेत्रींची केमिस्ट्री यात चांगली जमून आली आहे. चित्रपटात कॅमेऱ्याने आपली कामगिरी उत्तम पार पाडली आहे. चित्रपटाच्या कथा-पटकथेवर अजून मेहनत घेतली गेली असती; तर कलावंतांच्या चोख अदाकारीने नटलेल्या या चित्रपटाची चव अधिक मिठ्ठास झाली असती.
 

Web Title: Too Much Sweet, Little Angle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.