पत्नीचा छळ केल्याप्रकरणी ३ इडियट्सचे सह दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना अटक
By Admin | Updated: November 5, 2015 12:16 IST2015-11-05T11:32:15+5:302015-11-05T12:16:56+5:30
फेरारी की सवारी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि थ्री इडियट्स, मुन्नाभाई या चित्रपटांचे सहदिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी ३ इडियट्सचे सह दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - फेरारी की सवारी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि थ्री इडियट्स, मुन्नाभाई या चित्रपटांचे सहदिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोर्टाने राजेश मापुस्कर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
राजेश मापुस्कर यांची पत्नी निशा यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. २०१० मध्ये राजेशने बळजबरीने मला मनोरुग्णालयात दाखल करुन उपचार घ्यायला लावले असे निशा यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुंबई मिररशी बोलताना निशा यांनी पतीने केलेल्या अत्याचारांचा पाढाच वाचला. राजेश यांनी माझी मानसिक अवस्था ढासळली असून मी आत्महत्याच्या विचारांनी ग्रासल्याचे डॉक्टरांना सांगितले होते. मी या कालावधीत तब्बल १५ शॉक घेतले होते. डॉक्टरांनी माझ्यावरील उपचाराची माहिती प्रसारमाध्यमांनाही दिली होती. माझी माहिती जगजाहीर करुन डॉक्टरांनी प्रायव्हसीचे उल्लंघन केले असा आरोप निशा यांनी केला. राजेश व निशा यांना दोन मुलं असून सध्या निशा पोटगीसोबतच मुलांचा ताबा मिळावा यासाठी लढा देत आहेत. राजेशने मुलांना सोबत नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राजेशचे दुस-या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने त्यांनी राजेशसोबत जाण्यास नकार दिल्याचे निशा यांनी सांगितले. दरम्यान, निशा यांच्यावर ज्या मनोरुग्णालयात उपचार झाले त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी निशा यांचे आरोप फेटाळून लावले आहे. निशावरील उपचारांची त्यांच्या माहेरच्यांनाही माहिती दिली होती व तेदेखील उपचारात मदत करत होते असे डॉक्टरांनी म्हटले आहे. निशा व राजेश यांच्या लग्नाला १७ वर्ष झाले असून राजेशसोबत मी चाळीतही राहिले होते. राजेशवर माझे प्रेम होते व त्या कमाईतही मी समाधानी होते अशी भावनिक प्रतिक्रिया निशा यांनी दिली. .