फक्त स्पर्धकचं नाही, तर प्रेक्षकही जिंकणार पैसे! 'The 50' हा रिअॅलिटी शो नेमका आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:14 IST2026-01-13T18:13:05+5:302026-01-13T18:14:34+5:30
'द ५०' रिअॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी; पाहा कोणा-कोणाची लागणार वर्णी!

फक्त स्पर्धकचं नाही, तर प्रेक्षकही जिंकणार पैसे! 'The 50' हा रिअॅलिटी शो नेमका आहे काय?
The 50 Reality Show : टेलिव्हिजन विश्वात सध्या एकाच रिअॅलिटी शोची चर्चा आहे, तो म्हणजे 'द ५०'. निर्मात्यांनी या शोचा पहिला लूक प्रदर्शित केल्यापासून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता या शोबद्दलची सर्व माहिती समोर आली आहे. हा शो केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रेक्षकांना घरबसल्या बक्षीस जिंकण्याची संधी देणारा ठरणार आहे. जिओ-हॉटस्टारचे आलोक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द ५०' हा शो 'बिग बॉस'पेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. यामध्ये ५० सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होतील.
अंदाजे ५० भागांच्या या प्रवासात स्पर्धकांना काही आव्हानात्मक टास्क पूर्ण करावे लागतील. हळूहळू एलिमिनेशन होईल आणि शेवटी एक विजेता मिळेल. या शोचे शुटिंग हे थेट दुबईमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.
प्रेक्षक कसे जिंकणार पैसे?
या शोचा सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे चाहत्यांचा सहभाग. प्रेक्षक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाची निवड करू शकतात आणि त्यांच्यावर 'पैज' लावू शकतात. जर प्रेक्षकानं निवडलेला स्पर्धक विजयी झाला, तर त्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षीस रकमेचा एक मोठा वाटा त्या पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकामध्ये वाटला जाईल. म्हणजेच, तुमचा आवडता स्पर्धक जिंकला की तुमच्या खिशातही पैसे येणार आहेत.
कधी आणि कुठे पाहता येईल?
१ फेब्रुवारी २०२६ पासून हा शो सुरू होतोय. जिओ-हॉटस्टारवर रात्री ९:०० वाजता आणि कलर्स टीव्हीवर रात्री १०:३० वाजता हा शो पाहता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक बड्या सेलिब्रिटींना या शोसाठी विचारणा करण्यात आली आहे. यामध्ये करण पटेल, रिद्धी डोगरा, मल्लिका शेरावत, विवियन डिसेना, जय भानुशाली, धनश्री वर्मा, युजवेंद्र चहल, प्रतीक सहजपाल, निक्की तांबोळी आणि श्रीसंत यांसारख्या नावांची चर्चा आहे.