प्रसिद्ध कॉमेडियनचा मोठा निर्णय; अचानक स्टँडअप शोपासून घेतला ब्रेक, सांगितलं 'हे' कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:06 IST2025-09-07T14:05:59+5:302025-09-07T14:06:45+5:30
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियनचे चाहते निराश झाले आहेत.

प्रसिद्ध कॉमेडियनचा मोठा निर्णय; अचानक स्टँडअप शोपासून घेतला ब्रेक, सांगितलं 'हे' कारण
Zakir Khan: भारतातील लोकप्रिय कॉमेडियन म्हणजेच 'सख्त लौंडा' झाकीर खान. स्टँडअप कॉमेडी या क्षेत्रात सुरुवातीपासून त्याचं नाणं खणखणीत वाजलंय. झाकीरचे जगभरात फॅन्स आहेत. त्याचे शो हाऊसफुल असतात आणि प्रत्येक परफॉर्मन्सनंतर तो प्रेक्षकांची मनं जिंकतो.आपल्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकणारे झाकीर खाननं त्यांच्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. झाकीर खाननं त्याच्या व्यस्त कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत.
झाकीर खाननं सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे, दौऱ्यांमुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याने स्टेज शो आणि कामातून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. त्यानं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली. त्यानं लिहलं, "मी गेल्या १० वर्षांपासून सतत दौरे करत आहे. मला तुमचे प्रेम आणि आपुलकी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, पण इतके दौरे करणे आरोग्यासाठी चांगले नाही. लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न, दिवसातून २-३ शो, रात्री झोप नसणे, सकाळी लवकर विमानाने प्रवास आणि जेवणाच्या अनियमित वेळा यामुळे गेल्या एका वर्षापासून माझे आरोग्य बिघडले आहे. तरीही कामाची गरज असल्यामुळे मी काम करत राहिलो".
झाकीरने कबूल केले की त्याला स्टेजवर परफॉर्म करायला खूप आवडते, पण आता त्याला त्याच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे लागेल. तो म्हणाला, "मी एका वर्षापासून ब्रेक घेण्याचा विचार टाळत होतो, पण आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच ती सांभाळणे गरजेचे आहे. त्यामुळे, आता मी मर्यादित शहरांमध्येच दौरा करेन. जास्त शो करू शकणार नाही. माझा नवीन शोनं रेकॉर्ड केल्यानंतर, मला मोठा ब्रेक घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे". आता झाकीरच्या 'पापा यार' टूरची संख्या कमी असेल. ही टूर २४ ऑक्टोबरपासून सुरू होऊन ११ जानेवारी २०२६ पर्यंत चालेल.