ये उन दिनों की बात है या मालिकेच्या सेटवर या कारणामुळे समीरची भूमिका साकारणाऱ्या रणदीप रायला आवरले नाही त्याचे अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 15:45 IST2018-07-20T15:44:14+5:302018-07-20T15:45:27+5:30
मालिकेतील नैना (आशी सिंह) आणि समीर (रणदीप राय) या प्रमुख पात्रांमध्ये प्रेमाचे खूप निखळ आणि शाश्वत नाते दाखवलेले आहे. पण या दोघांचा विरह आता मालिकेत दाखवला जाणार आहे.

ये उन दिनों की बात है या मालिकेच्या सेटवर या कारणामुळे समीरची भूमिका साकारणाऱ्या रणदीप रायला आवरले नाही त्याचे अश्रू
आपणा सर्वांच्या जीवनात चढ उतार अनुभवास येत असतात. काही वेळा आपण काही घटनांमध्ये इतके गुंतून जातो की, त्याचा ताण आपल्या मनावर येतो आणि कधी तरी त्या भावना उफाळून येतात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ये उन दिनों की बात है या मालिकेच्या सेटवर अलीकडे अशीच एक घटना घडली. मालिकेतील नैना (आशी सिंह) आणि समीर (रणदीप राय) या प्रमुख पात्रांमध्ये प्रेमाचे खूप निखळ आणि शाश्वत नाते दाखवलेले आहे. या प्रेमी युगुलामध्ये अंतर पडावे असे कुणालाच वाटणार नाही. पण जर तसे झाले तर? होय, टेलिव्हिजनवरील एक अत्यंत लोकप्रिय जोडी नैना आणि समीर लवकरच एकमेकांपासून दुरावणार आहेत.
या दोघांचे दुरावतानाचे दृश्य चित्रीत करताना प्रमुख कलाकारांसह सर्वच जण काहीसे भावुक झाले होते. नेहमीच दंगामस्तीत असणार्या या जोडीला देखील या दृश्याचे चित्रीकरण करणे अवघड झाले. नैना आणि समीर यांच्यातील पडद्यावरील बंध खूपच दृढ आहेत. त्यामुळे या दृश्याचे चित्रीकरण करताना समीरला भावना अनावर झाल्या. सेटवरील सूत्राने सांगितले की, रणदीप आपल्या पडद्यावरील समीर या व्यक्तिरेखेत पूर्ण गुंतलेला होता आणि जेव्हा नैना त्याला सांगते की, तिला हे नाते संपवण्याची इच्छा आहे, तेव्हा तो खरोखरच भावनिक झाला होता. याबाबत रणदीपशी संपर्क साधला असता त्याने सांगितले, “होय, हे खरे आहे. नैना जेव्हा समीरला सांगते की, तिला त्यांच्यातील नात्याला पूर्णविराम द्यायचा आहे, तेव्हा त्या दृश्याचे चित्रीकरण करताना मी खूपच भावुक झालो होतो. मालिकेच्या सुरुवातीपासूनच त्या दोघांमधील नाते खूप घट्ट असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि आता जेव्हा मला त्या दृश्याचे चित्रीकरण करायचे होते, तेव्हा मला वैयक्तिकरित्या सर्व काही संपल्यासारखे वाटले. मी त्या दृश्याशी इतका समरस झालो होतो की, माझ्या नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मला वाटते, प्रत्येक कलाकार कधी ना कधी तरी या अनुभवातून जातच असेल, कारण आम्ही कलाकार बहुतांश वेळा पडद्यावरील व्यक्तिरेखा जगत असतो."