"काय राव आता सिरियलमध्ये पण बिबट्या आला का?", नव्या प्रोमोमुळे राया-मंजिरीची मालिका ट्रोल
By कोमल खांबे | Updated: November 23, 2025 13:52 IST2025-11-23T13:50:36+5:302025-11-23T13:52:08+5:30
सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. मानवी वस्तीत आणि गावात बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या घटनांचा संदर्भ घेऊन आता 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही बिबट्याची एन्ट्री झाली आहे.

"काय राव आता सिरियलमध्ये पण बिबट्या आला का?", नव्या प्रोमोमुळे राया-मंजिरीची मालिका ट्रोल
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत राया आणि मंजिरीची लग्नाची धामधूम सुरू आहे. पण, अचानक मालिकेने वेगळाच ट्रॅक पकडल्याचं दिसत आहे. सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. मानवी वस्तीत आणि गावात बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या घटनांचा संदर्भ घेऊन आता 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही बिबट्याची एन्ट्री झाली आहे.
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मंजिरी-रायाचा मेहेंदीचा कार्यक्रम असल्याचं दिसत आहे. या कार्यक्रमासाठी मेहेंदी आणायला गेलेला निखिल उशीर झाला तरी परतला नसल्यामुळे मंजिरी रायाकडे चिंता व्यक्त करते. तेवढ्यात दरवाजावर थाप पडते. दरवाजा उघडल्यावर निखिल जखमी अवस्थेत दिसतो. त्याच्यावर कुणीतरी हल्ला केल्याचा संशय सगळे व्यक्त करतात. पण हा हल्ला कुणी माणसाने केला नसून जंगली जनावराने केल्याचं राया ओळखतो. तेव्हाच प्रोमोमध्ये बिबट्याची एन्ट्री होते. "म्हणजे गावात बिबट्या शिरलाय", असं कोणीतरी म्हणतं. आता गावात शिरलेल्या या बिबट्याला राया कसा सामोरा जाणार? आणि गावाकऱ्यांचं या बिबट्यापासून कसं रक्षण करणार हे पाहणं रंजनकारक असणार आहे.
पण, 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या या नव्या प्रोमोमुळे मालिका ट्रोल होत आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. "बिबट्या ट्रेंडिंग आहे म्हणून आता सिरियलमध्ये आला", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "बिबट्या म्हणतोय माझं स्वागत नाही करणार का?" अशी कमेंट केली आहे. "आमंत्रण नाही दिलं लग्नाचं म्हणून बिबट्या स्वत: आला", "काय राव आता सिरियलमध्ये पण बिबट्या आला का?", "सांगलीमधला बिबट्या सिरियलमध्ये आला वाटतं", अशा अनेक कमेंट्स या प्रोमोवर केल्या आहेत.