छोट्या पडद्यावर काम करायला आवडेल!
By Admin | Updated: June 5, 2016 02:41 IST2016-06-05T02:41:27+5:302016-06-05T02:41:27+5:30
जुनुनियत या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता पुलकित सम्राट यांची जोडी पुन्हा एकदा झळकणार आहे. या चित्रपटात एक सुरेख प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावर काम करायला आवडेल!
‘जुनुनियत’च्या निमित्ताने यामी गौतमची ‘सीएनएक्स’शी खास बातचीत
जुनुनियत या चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता पुलकित सम्राट यांची जोडी पुन्हा एकदा झळकणार आहे. या चित्रपटात एक सुरेख प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री यामी गौतमने ‘सीएनएक्स’सोबत केलेली खास बातचीत
प्रश्न : सनम रे या चित्रपटानंतर तू पुल्कितसोबत जुनुनियत या चित्रपटात पुन्हा एकदा काम करत आहेस, पुल्कितसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?
सनम रे हा चित्रपट जुनुनियतच्या आधी प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटांचे चित्रीकरण आम्ही एकत्रच केले होते. दोन दिवस आम्ही समनचे चित्रीकरण करायचो तर दोन दिवस जुनुनियतचे. यामुळे मी आणि पुल्कित दोघेही एका वेळी दोन व्यक्तिरेखा जगत होतो. पुल्कित हा खूप चांगला अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करायला मजा येते. तसेच आमच्या दोघांची केमिस्ट्रीही आता खूप छान जमली आहे.
प्रश्न : तुझी आणि पुल्कितची जोडी बॉलिवूडमध्ये एक प्रसिद्ध जोडी म्हणून नावारूपाला येईल असे तुला वाटते का?
चित्रपटातील प्रेमकथा आवडल्याशिवाय प्रेक्षकांना त्या चित्रपटातील जोडी आवडत नाही. आम्ही चांगल्या प्रेमकथा असलेल्या चित्रपटांमध्ये काम केले तर लोकांना आमची दोघांची जोडी आवडेल अशी मला खात्री आहे. लोक कलाकारांच्या नव्हे तर चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडत असतात. व्यक्तिरेखा सशक्त असेल तर प्रेक्षकांना जोडी आवडते. त्यामुळे जुनुनियत या चित्रपटातीलही आमची जोडी प्रेक्षकांना आवडेल असे मला वाटते.
प्रश्न : जुनुनियतची कथा ही आर्मी आॅफिसरच्या आयुष्यावर असल्याने तुम्ही सैन्यातील अनेकांना भेटला होता हे खरे आहे का?
जुनुनियत या चित्रपटात पुल्कित एका आर्मी आॅफिसरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण आम्ही काश्मीरमध्ये केले आहे. चित्रीकरणाच्या वेळी सैन्यातील अनेकांना आम्ही भेटलो होतो. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानेही भारतीय सैनिकांना भेटायचे असे आम्ही ठरवले आहे.
प्रश्न : बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसतानाही तू तुझे प्रस्थ निर्माण केले आहेस. या क्षेत्रात गॉडफादरची आवश्यकता असते असे तुला वाटते का?
गॉडफादर असल्यास तुम्हाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळतो. पण पहिला चित्रपट केल्यानंतर इंडस्ट्रीत टिकून राहाणे हे खूप महत्त्वाचे असते. हे तुमच्या अभिनयावरच अवलंबून असते. त्यामुळे गॉडफादर असणे महत्त्वाचे असते असे मला वाटत नाही.
प्रश्न : तू काबिल या चित्रपटात हृतिक रोशनसोबत काम करत आहे. काबिलच्या चित्रीकरणाचा तुझा अनुभव कसा आहे?
- काबिल या चित्रपटाची टीम ही खूपच चांगली आहे. संजय गुप्ता या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर या चित्रपटाचे संगीत राजेश रोशन देत आहेत. चांगल्या टीमसोबत काम करणे हे माझ्यासाठी एखादे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. हृतिकसोबत काम करताना तो इतका मोठा स्टार आहे असे थोडेही जाणवत नाही. तो त्याच्या कामाच्या बाबतीत प्रचंड परफेक्ट असून स्वभावानेही खूप चांगला आहे.
प्रश्न : तू तुझ्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली आहे. पुन्हा छोट्या पडद्यावर काम करण्याचा विचार आहे का?
छोटा पडदा हा माझ्यासाठी नेहमीच स्पेशल आहे. कारण त्यामुळेच मला लोकांपर्यंत पोहोचता आले. आज छोटा पडदा खूप सशक्त बनला आहे. अनेक मोठे कलाकाराही येथे काम करत आहेत. त्यामुळे भविष्यात मला संधी मिळाली तर मला येथे काम करायला नक्की आवडेल.
प्रश्न : तू दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटातही काम केले आहेस, तुला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल का?
मराठी चित्रपटांची प्रगती पाहता बॉलिवूडमधील अनेक प्रथितयश कलाकार मराठीत काम करण्यास उत्सुक आहेत. चांगली कथा असल्यास मी मराठीत नक्कीच काम करेन.
- prajakta.chitnis@lokmat.com