"तू आई होऊ शकणार नाहीस", २७व्या वर्षी जुई गडकरीला कळलं होतं धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 06:19 PM2024-03-08T18:19:29+5:302024-03-08T18:19:46+5:30

"खऱ्या आयुष्यात बाळ होणार नाही आणि ऑनस्क्रीन मला आईची भूमिका साकारायची होती," जुई गडकरीने सांगितला भावनिक प्रसंग

womens day special jui gadkari talk about her medical phase said doctor said me i cant become mother | "तू आई होऊ शकणार नाहीस", २७व्या वर्षी जुई गडकरीला कळलं होतं धक्कादायक वास्तव

"तू आई होऊ शकणार नाहीस", २७व्या वर्षी जुई गडकरीला कळलं होतं धक्कादायक वास्तव

जुई गडकरी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेतून जुईला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत जुई मुख्य भूमिकेत होती. अनेक मालिकांमध्ये काम करत जुईने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असतानाच जुईला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत जुईने या कठीण काळाबद्दल भाष्य केलं. 

जुई म्हणाली, "वयाच्या २७व्या वर्षी मला डॉक्टरांनी सांगितलं की तू आई होऊ शकणार नाहीस. डॉक्टरांनी हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी एकटीच होते. त्यानंतर त्यांनी मला आईला बोलवून घ्यायला सांगितलं. तेव्हा पुढचं पाऊल ही मालिका सुरू होती. आणि त्यात कल्याणीला मूल होणार होतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात बाळ होणार नाही आणि ऑनस्क्रीन मला आईची भूमिका साकारायची होती. माझ्यासाठी हे खूप कठीण होतं. माझे बरेच अवयव डॅमेज होते. जेव्हा कळलं तेव्हा मला खूप त्रास झाला. तेव्हा माझं बरंच कामंही सुरू होतं. एवढ्या कमी वयात आपलं शरीर जेव्हा अशक्त होतं. तेव्हा आपण मानसिकदृष्ट्याही खचतो. त्याचा कामावरही परिणाम व्हायला लागला होता. माझे डान्स शोही कॅन्सल झाले." 

"एक्सरे एमआरए केल्यानंतर कळलं की मणका डिजनरेट झाला आहे. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझा मणका ६०वर्षांच्या माणसासारखा दिसतो आहे. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता. ज्यामुळे मी आई होण्याची शक्यता कमी होत होती. थायरॉइड वाढला होता. व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला होता. मला आडवं होऊन झोपताच येत नव्हतं. कितीतरी रात्री, महिने मी बसून झोपलेले आहे. नंतर डॉक्टरांनी ब्लड टेस्ट केल्यावर कळलं की RA+(rheumatoid arthritis) आहे.  या आजारात तुमची इम्युन सिस्टिम शरीरातील चांगल्या टिश्यूंवर अटॅक करते. मला हा आजार ७ वर्षांनी कळला. ज्यांना हा आजार आहे त्यांना मी विनंती करते की रोज उठून थोडे तरी सूर्यनमस्कार घाला. योगामुळे माझी शारीरिक क्षमता वाढली. रक्ताभिसरण चांगलं झालं. २-३ वर्ष मी या सगळ्या गोष्टींसाठी दिली. प्रत्येक वेळेस जीममध्ये जाऊन वजन उचलण्याची गरज नाही. त्यानंतर मी आहारात बदल केले. याबरोबरच अध्यात्मिकाचीही जोड हवी," असंही जुई पुढे म्हणाली. 

"आपल्याकडे स्त्रीला मुलबाळ झाल्यावरच ती पूर्ण होते, असं मानलं जातं. पण, मग ज्या महिलांना मूल होऊ शकणार नाही. त्यांनी काय करायचं? ती स्त्री नाही का? तिच्याच मातृत्व नाही का? मलाही अजून लोक म्हणतात की ३५शी ओलांडली आता कधी लग्न करणार. पण, माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. आणि यात माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. त्यामुळे मला याचा फरक पडत नाही. माझे रिपोर्ट आता चांगले येत आहेत. त्यामुळे भविष्यात मी जुळ्या मुलांची आईही होऊ शकते," असंही पुढे जुईने सांगितलं. आजारामुळे जुईला कलाविश्वातून काही काळ ब्रेक घ्यावा लागला होता. या आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर जुईने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली. सध्या जुई स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  

Web Title: womens day special jui gadkari talk about her medical phase said doctor said me i cant become mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.