मराठी अभिनेत्रीनं स्वत:च्या हातानी काढलं विराट कोहलीचं अप्रतिम स्केच, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:53 IST2025-11-06T15:53:09+5:302025-11-06T15:53:56+5:30
मराठी अभिनेत्रीनं आपल्या हाताने विराट कोहलीचे सुंदर स्केच काढले.

मराठी अभिनेत्रीनं स्वत:च्या हातानी काढलं विराट कोहलीचं अप्रतिम स्केच, पाहा व्हिडीओ
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. क्रिकेटप्रेमींपासून ते अनेक अभिनेत्रीसुद्धा विराटच्या प्रेमात आहेत. एक मराठी अभिनेत्री सुद्धा विराटची मोठी चाहती आहे. नुकतंच विराटनं ५ नोव्हेंबर रोजी त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मराठी अभिनेत्रीनं अतिशय खास आणि भावनिक अंदाजात विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यामुळे तिचे विराटवरील प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले.
ती अभिनेत्री आहे रुचिरा जाधव. विराट कोहलीची रुचिरा जाधव ही मोठी चाहती आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा तिचे 'विराट प्रेम' व्यक्त करत असते. विराटच्या वाढदिवसानिमित्त तिने यावेळी काहीतरी वेगळे आणि खास करण्याचे ठरवले. रुचिराने मालिकेच्या सेटवर असतानाही वेळात वेळ काढून आपल्या लाडक्या क्रिकेटपटूसाठी एक सुंदर कलाकृती साकारली. तिने आपल्या हाताने विराट कोहलीचे सुंदर स्केच काढले.
रुचिराने स्केच काढताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, ज्यात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, "आज विराटचा... माझ्या विराटचा... आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विराटचा वाढदिवस आहे. मी मालिकेच्या सेटवर आहे, शूटिंग करत आहे. मला खूप दिवसांपासून विराटचं स्केच काढायचं होतं, पण संधी मिळाली नाही. पण, मला हा आजचा क्षण गमवायचा नाही, त्यामुळे मी विराटचं स्केच काढणार आहे".
तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, द विराट क्रिकेटचा सूर्य! तू प्रत्येक डावासोबत आणखी तेजाने चमकत राहो आणि आम्हा सगळ्यांना नेहमी प्रेरणा देत राहो! मी तुझ्यावर खूप प्रेम करते. हा माझा तुला शुभेच्छा देण्याचा मार्ग... माझ्या कलेतून. मोठं काही देऊ शकले नाही, पण हे मनापासून केलं आहे. परफेक्ट नाहीये, पण मनापासून एका मनासारख्या व्यक्तीसाठी केलं आहे". रुचिरा जाधवच्या या कृतीने तिच्या चाहत्यांचे आणि विराट कोहलीच्या चाहत्यांचे मन जिंकले आहे.