विघ्नहर्ता गणेश मालिकेद्वारे प्रेक्षकांना कळणार गणरायाविषयी या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 05:30 PM2018-09-18T17:30:38+5:302018-09-18T18:12:53+5:30

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विघ्नहर्ता गणेश मालिकेचे निर्माते गणेशाच्या जीवनातील काही घटना, गोष्टी लघु व्हिडिओच्या माध्यमातून सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. हे व्हिडिओ दररोज ही मालिका संपल्यानंतर काही मिनिटांसाठी दाखवले जातील

Vighnaharta Ganesha will tell u unknown things about Ganesha | विघ्नहर्ता गणेश मालिकेद्वारे प्रेक्षकांना कळणार गणरायाविषयी या गोष्टी

विघ्नहर्ता गणेश मालिकेद्वारे प्रेक्षकांना कळणार गणरायाविषयी या गोष्टी

googlenewsNext

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेने भारतातील पौराणिक टीव्ही मालिकांचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. उच्च दर्जाचे VFX ग्राफिक्स आणि मो-कॅप (मोशन कॅप्चर) तंत्रज्ञानामुळे गणेशाच्या बारीकसारिक हालचाली आणि चेहर्‍यावरील सजीव हावभाव यामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत एका बालकाचे ‘प्रथम देवते’त रूपांतर कसे झाले याची कथा सांगितली आहे.  

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विघ्नहर्ता गणेश मालिकेचे निर्माते गणेशाच्या जीवनातील काही घटना, गोष्टी लघु व्हिडिओच्या माध्यमातून सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. हे व्हिडिओ दररोज ही मालिका संपल्यानंतर काही मिनिटांसाठी दाखवले जातील आणि प्रेक्षकांच्या ज्ञानात भर घालतील. विघ्नहर्ता गणेशाच्या बाबतीतील या काही अज्ञात गोष्टी प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहेत.
 
भगवान गणेशाला दुर्वा का वाहतात?
दुर्वा ही गणपतीची निःस्सीम भक्त होती. तिला कोणत्याही रूपात पण गणेशाच्या सान्निध्यात राहायचे होते. म्हणून पर्वतीने तिला आशीर्वाद देऊन तिचे दुर्वांमध्ये रूपांतर केले. जेव्हा गणेशाने अर्नलासुराचा वध केला, तेव्हा त्याच्या शरीराचे उष्णतामान खूप वाढले. त्यावेळी पार्वतीने त्याला दुर्वा वाहिल्या आणि त्यास शीतल केले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

गणेशाला ‘एकदंत’ का म्हणतात?
शिव आणि पार्वती एकदा एक पूजा करत होते. पूजा समाप्त होईपर्यंत कोणालाही पूजेच्या स्थानी येऊ न देण्याची जबाबदारी गणेशावर सोपवण्यात आली होती. शिवाचा भक्त परशुराम कैलासावर आला आणि शिवाला भेटण्यास मज्जाव केल्यामुळे गणेशसोबत त्याचे युद्ध झाले आणि त्यात परशुरामच्या परशुने गणेशाचा एक दात तुटला. त्यामुळे त्याला एकदंत म्हणतात.

 
गणेशाला हत्तीचे मस्तक कसे लाभले?
पार्वती स्नान करत असताना तिने गणेशाला (त्यावेळी त्याचे नाव विनायक होते) दरवाजावर राखण करण्यास सांगितले. तिचे स्नान होण्यापूर्वी कोणालाही आत न सोडण्याची सूचना त्याला देण्यात आली होती. शिव आपल्या गणांसह कैलासावर परतला, तेव्हा आपल्या आईच्या आज्ञेचे पालन करत गणेशाने शिवाला दरवाजात रोखले. त्यावरून शिवाचे गण आणि विनायक यांच्यात तुंबळ युद्ध झाले, अगदी ब्रह्मदेव आणि विष्णुसह इतर देव देखील युद्धात सामील झाले. अखेरीस शिवाने आपले त्रिशूळ त्या मुलावर फेकले आणि त्याचा शिरच्छेद केला. त्यावर संतप्त झालेल्या पार्वतीला शांत करण्यासाठी शिवाने वचन दिले की, तो विनायकाला दुसरे मस्तक देईल. त्यावेळी देवांना एक छोटा हत्ती सापडला, ज्याचे मस्तक घेऊन ते शिवाकडे आले आणि हेच मस्तक विनायकाच्या धडावर जोडण्यात आले आणि अशाप्रकारे त्यास गजमुख हे नाव मिळाले.

त्याशिवाय, गणेशाला मोदक का प्रिय आहेत, त्यास शेंदूर का वाहतात, गणेश ‘प्रथम देवता’ कसा झाला, उंदीर हे गणेशाचे वाहन कसे बनले यांसारख्या इतर अनेक रोचक गोष्टी प्रेक्षकांना या व्हिडिओद्वारे सांगितल्या जातील.

Web Title: Vighnaharta Ganesha will tell u unknown things about Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.