'बिग बॉस'नंतर वर्षा उसगांवकरांचा धमाका, 'स्टार प्रवाह'च्या 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:23 IST2025-12-28T13:20:58+5:302025-12-28T13:23:18+5:30
वर्षा उसगांवकर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

'बिग बॉस'नंतर वर्षा उसगांवकरांचा धमाका, 'स्टार प्रवाह'च्या 'या' लोकप्रिय मालिकेत एन्ट्री
Varsha Usgaonkar : मराठी सिनेविश्वातील 'वंडरगर्ल' आणि 'ड्रीमगर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकल्यानंतर वर्षा उसगांवकर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेली मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये वर्षा उसगांवकर यांनी 'नंदीनी शिर्केपाटील' म्हणजेच 'माई' ही भूमिका अजरामर केली होती. आता याच 'माई'च्या रूपात वर्षा उसगांवकर स्टार प्रवाहच्याच 'नशीबवान' या नव्या मालिकेत एन्ट्री घेत आहेत. या कमबॅकमुळे त्यांचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत.
'नशीबवान' मालिकेच्या आगामी भागात माईंची एन्ट्री अत्यंत रंजक वळणावर होणार आहे. मालिकेतील मुख्य पात्र गिरिजाला नागेश्वर विरुद्ध लढण्यासाठी माई बळ देताना दिसणार आहेत. "तुझी रक्षणकर्ती तूच आहेस पोरी… तुझ्या मनगटातील बळ तू सर्वांना दाखव… कर दोन हात!" असे म्हणताना त्या प्रोमोमध्ये दिसून आल्या आहेत.
वर्षा उसगांवकर यांचा हा विशेष भाग ३० डिसेंबरला रात्री ९ वाजता 'स्टार प्रवाह'वर प्रसारित होणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकर नेमक्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. आता पुन्हा एकदा 'माई'च्या रुपात प्रेक्षक त्यांना पाहू शकतील. 'नशीबवान' या मालिकेत आधीच अजय पूरकर, आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, सोनाली खरे, प्राजक्ता केळकर आणि सानिका मोजर यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. आता वर्षा उसगांवकर यांच्या एन्ट्रीमुळे मालिकेची रंगत अधिकच वाढणार आहे.