नवऱ्याचा फोटो का नाही? कमेंट वाचल्यावर उषा नाडकर्णी भडकल्या; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:34 IST2025-11-19T14:33:42+5:302025-11-19T14:34:31+5:30
तुम्हाला काय करायचं? उषाताई स्पष्टच बोलल्या

नवऱ्याचा फोटो का नाही? कमेंट वाचल्यावर उषा नाडकर्णी भडकल्या; म्हणाल्या...
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी अनेकदा त्यांच्या मुलाखतींमुळे चर्चेत असता. बिंधास्त, रोखठोक बोलणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही उषा नाडकर्णी या मुंबईत एकट्याच राहतात. तर त्यांचा मुलगा पत्नी आणि मुलांसह त्याच्या मामांकडे राहतो. उषाताई कायमच शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने सुरुवातीपासूनच त्यांचा मुलगा मामाकडे असतो आणि आता आजही तिथेच राहतो. नुकतंच उषा नाडकर्णी मुलाखतीत नवऱ्याच्या उल्लेखावरुन भडकल्या.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, "मला तर वाटतं ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय आहे, ज्यांनी आपल्यासाठी सगळं काही केलं त्यांच्या पडत्या वयात आपण त्यांना सोडता कामा नये. त्यांना आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे. आता त्यांची वेळ आली आहे. मी सुद्धा माझ्या आईकडे जायची. तिला केस विंचरुन देऊ का विचारायची. तिला माझ्या भावाचं खूप होतं. कारण तिचं सगळं माझ्या भावाने केलं. आईचा ७० वा, ८० वा वाढदिवसही माझ्या भावाने केला होता."
त्या पुढे म्हणाल्या, "माझ्या नवऱ्याची मावशी होती ज्या एकट्याच होत्या. तेव्हा आम्ही वाकोल्याच्या घरी राहायचो. त्यांना आम्ही आमच्या घरी आणलं होतं. तेव्हा मी त्यांना तुम्ही आमच्याबरोबरच राहा असं म्हटलं होतं. आजकाल सोशल मीडियावर लोक काहीही बोलतात. आता नवरा बायको आहेत जे घरात नाच करतात तुमचं काय जातंय? करु दे ना...मागच्या वेळेला मी एकदा माझे जुने फोटो दाखवत होते तेव्हा कोणीतरी कमेंटमध्ये विचारलं की, 'अरे नवऱ्याचा फोटो नाहीचे'. असं काहीही लिहितात. तुम्ही फोटो बघा ना..नसेल बघायचं तर बंद करा. तुम्हाला काय करायचं? जे दिसतंय ते बघा. बोलू नका वाईट वाटतं. आम्ही काही बोललो तर ते तुम्हाला झोंबतं. तेही बोलायचं नाही."