"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 15:22 IST2025-08-31T15:21:32+5:302025-08-31T15:22:12+5:30

Usha Nadkarni on Priya Marathe Death: प्रियाला कॅन्सर झाला होता हे मी ऐकलं होतं...उषा नाडकर्णी काय म्हणाल्या वाचा

usha nadkarni feels emotional after knowing about priya marathe demise both were in pavitra rishta | "आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर

"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर

प्रिया मराठे (Priya Marathe) म्हटलं की आठवते ती 'पवित्र रिश्ता' मालिका. प्रियासह उषा नाडकर्णी, अंकिता लोखंडे, सविता प्रभुणे, प्रार्थना बेहेरे असे मराठी कलाकार या मालिकेत होते. ही मालिका तुफान गाजली होती. प्रिया, प्रार्थना आणि अंकिता या मालिकेत बहिणी होत्या. आज प्रिया मराठेच्या निधनाची बातमी ऐकताच सर्वांनाच अश्रू अनावर झाले आहेत. तिचं असं अचानक जाणं कोणालाच पटलेलं नाही. ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रियाच्या सहकलाकार उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांनी ही बातमी ऐकून हंबरडा फोडला आहे.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, "प्रियाला कॅन्सर झाला होता हे मी ऐकलं होतं. एवढ्या कमी वयात कॅन्सर होणं हे ऐकून मला तिच्यासाठी खूप वाईट वाटलं होतं. ती त्यातून बरीही झाली होती आणि पुन्हा कामही करत होती. सगळं चांगलं झालं होतं. मग काही दिवसांपूर्वीच मला कळलं की तिची तब्येत पुन्हा बिघडली आहे.  आम्ही तिला भेटायला जायचंही ठरवलं होतं पण तिचे पती शंतनु मोघे यांनी आम्हाला येऊ नका असं सांगितलं. कदाचित किमोथेरपीमुळे तिचे सगळे केस गळाले असतील म्हणून तिला कोणालाच भेटायची इच्छा झाली नसेल. ही अगदी काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आपल्या सर्वांच्या घरी नुकताच गणपती बाप्पा विराजमान झाला. त्यामुळे तिच्या अंत्यदर्शनाला जाणं होणार नाही. पण मला खूप वाईट वाटत आहे. देव इतका निष्ठुर कसा झाला? ही काही तिच्या निरोपाची वेळ नव्हती."

त्या पुढे म्हणाल्या, "ती खूप गुणी मुलगी होती. नेहमी हसत असायची. सर्वांशी मिळून मिसळून असायची. अशा प्रकारे माझ्या सहकलाकारांचं  निधन होतं तेव्हा फार वाईट वाटतं. काही वर्षांपूर्वीच तर तिचा संसार सुरु झाला होता. त्यांनी घरही घेतलं होतं. तिला मूल नव्हतं हे आता चांगलंच झालं असं म्हणावं लागेल. कारण नाहीतर त्यांचं काय झालं असतं असाच प्रश्न मनात आला असता."

Web Title: usha nadkarni feels emotional after knowing about priya marathe demise both were in pavitra rishta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.