या कार्यक्रमाद्वारे उर्मिला मातोंडकर परतणार छोट्या पडद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 08:00 IST2018-09-03T17:02:08+5:302018-09-04T08:00:00+5:30
बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 2008 मध्ये छोट्या पडद्यावर दिसली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘अद्भुत गणेशोत्सव’ या विशेष कार्यक्रमाद्वारे ती तब्बल दशकभरानंतर टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

या कार्यक्रमाद्वारे उर्मिला मातोंडकर परतणार छोट्या पडद्यावर
गणेश चतुर्थी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली असून गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळे आतुरतेने वाट पाहात आहेत. गणेशोत्सवाची जोरदार तयारी सगळीकडे सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्टार प्लस वाहिनीवर एक खास कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमात प्रेक्षकांना गणेशोत्सव या सणाचा आनंद घरबसल्या घेण्याची सोय ‘स्टार प्लस’ वाहिनीने केली आहे. या वाहिनीने भव्य सेट, नामवंत व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असलेल्या आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन ‘अद्भुत गणेशोत्सव’ नावाने केले आहे. या विशेष कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर एक नृत्य सादर करणार आहे.
बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 2008 मध्ये छोट्या पडद्यावर दिसली होती. आता ‘स्टार प्लस’वरील ‘अद्भुत गणेशोत्सव’ या विशेष कार्यक्रमाद्वारे ती तब्बल दशकभरानंतर टीव्हीच्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. आपल्या नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मराठी मुलीने या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तो एकाच कारणासाठी ते म्हणजे हे नृत्य गणपतीसाठी आहे. एरव्ही टीव्हीपासून दूर राहणाऱ्या या अभिनेत्रीने केवळ गणपतीसाठी छोट्या पडद्यावर झळकायचे ठरवले आहे. यात ती काही गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर करणार आहे. तसेच ती डान्स इंडिया डान्स फेम शक्ती मोहनसोबत “पिंगा ग पोरी पिंगा” या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे.
आपल्या स्टायलिश लूकबद्दल प्रसिद्ध असलेली उर्मिला या कार्यक्रमासाठी अनेक गोष्टींवर बारकाईने लक्ष देत आहे. या कार्यक्रमात ती मराठमोळ्या अंदाजात दिसणार आहे. ती या कार्यक्रमात नऊवारी साडी नेसणार असून नाकात नथ घालणार आहे. तसेच केसांचा आंबाडा बांधणार आहे. आपल्या नृत्याबद्दल ती अतिशय उत्सुक असून लवकरच या कार्यक्रमासाठी नृत्याच्या तालमीला सुरुवात करणार आहे.
‘अद्भुत गणेशोत्सव’ या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, टीव्ही आणि मराठी चित्रपटांतील लोकप्रिय कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. पाच दिवसांच्या या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी मालिकेमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि ऋतविक धनजानी करणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांना 10-14 सप्टेंबरदरम्यान रात्री 8 वाजता ‘स्टार प्लस’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.