आदिनाथनंतर उर्मिला कोठारेचंही टेलिव्हिजनवर कमबॅक, 'या' मालिकेत दिसणार, प्रोमो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:05 IST2025-11-21T15:03:48+5:302025-11-21T15:05:00+5:30
मालिकेत जेलमधून सुटका झाल्यानंतर स्वत:च्या घरी परतलेल्या एका कैदी महिलेची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या कैदी महिलेची भूमिका अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने साकारली आहे.

आदिनाथनंतर उर्मिला कोठारेचंही टेलिव्हिजनवर कमबॅक, 'या' मालिकेत दिसणार, प्रोमो समोर
काही दिवसांपूर्वीच कलर्स मराठी वाहिनीवर 'बाईपण जिंदाबाद' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतून महिलांच्या काही कथा दाखवल्या जातात. या मालिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'बाईपण जिंदाबाद' मालिकेत आता जेलमधून सुटका झाल्यानंतर स्वत:च्या घरी परतलेल्या एका कैदी महिलेची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या कैदी महिलेची भूमिका अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने साकारली आहे.
उर्मिला या मालिकेतून टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. आदिनाथ कोठारे पाठोपाठ उर्मिलाही चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'बाईपण जिंदाबाद'मधून उर्मिला अनुराधा ही व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दिसतंय की जेलमधून सुटका झाल्यानंतर उर्मिला तिच्या घरी येते. पण, घरात, नातेवाईकांकडून आणि समाजातही तिला तुच्छ वागणूक मिळते. जेलमध्ये राहून आल्यामुळे तिला हिणवलं जात आणि टोमणे ऐकू येतात. स्वत:ची मुलं आणि नवराही तिला स्वीकारायला तयार होत नाही. पण, हे सगळं झुगारून अनुराधा तिचं स्वातंत्र्य एन्जॉय करण्याचा निर्णय घेते.
"देशपांडेंची सून जेलमधून परत येतेय...नक्कीच तीदेखील क्रिमिनल झाली असेल", "कशा कशा लोकांबरोबर जेलमधून राहून आलीस", "ती उगाच आलीस इथे" असं लोकांचं बोलणं सतत तिच्या कानावर पडतं. पण अनुराधा हरत नाही ती सगळ्यांना म्हणते, "कोर्टाने मला तीन वर्ष कैद दिली. पण तुम्ही जन्मठेप दिली. माझं स्वातंत्र्य मी सेलिब्रेट करणार". त्यानंतर अनुराधा सोसायटीच्या कार्यक्रमात मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. हा प्रोमो प्रेक्षकांना आवडला आहे. 'बाईपण जिंदाबाद'मध्ये अनुराधाची कथा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.