तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांनी घेतली 'या' जेष्ठ अभिनेत्रीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:15 IST2020-01-03T07:15:00+5:302020-01-03T07:15:00+5:30

या मालिकेच्या कथानकाने नुकतीच ५ वर्षांची लीप घेतली.

Tuzhat jeev rangala team meet senior actress sulochana didi | तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांनी घेतली 'या' जेष्ठ अभिनेत्रीची भेट

तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांनी घेतली 'या' जेष्ठ अभिनेत्रीची भेट

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेच्या कथानकाने नुकतीच ५ वर्षांची लीप घेतली. या मालिकेच्या वेळेत देखील बदल झाले, तरी देखील प्रेक्षकांचं या मालिकेवरील प्रेम काही कमी झालं नाही. नुकतंच या मालिकेने १००० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.

या मालिकेचे आणि त्यातील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री ‘सुलोचना दीदी’ यांनी या कलाकारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुलोचना दीदी हि मालिका नियमितपणे बघतात आणि त्यातील कलाकारांना भेटण्याची त्यांची तीव्र इच्छा होती,  म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या कलाकारांनी सुलोचना दीदींची त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. राणादा, पाठक बाई, लाडू या सगळ्यांना भेटून सुलोचना दीदींना आनंद झाला आणि या भेटीने हे कलाकार देखील भारावून गेले.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरमध्ये होतं आणि सुलोचना दीदी या स्वतः देखील कोल्हापूरच्या आहेत त्यामुळे कलाकारांशी गप्पा मारताना कोल्हापूरचे अनेक किस्से आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

 

Web Title: Tuzhat jeev rangala team meet senior actress sulochana didi