थकलेला चेहरा, डोळ्यांवर चष्मा अन् घटलेलं वजन; 'तारक मेहता'मधील दयाबेनचं बदललेलं रुप पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:40 IST2025-12-24T13:36:01+5:302025-12-24T13:40:37+5:30
जुनी दया कुठे हरवली? 'तारक मेहता' फेम अभिनेत्री मुलीसोबत दिसली, चाहत्यांनी ओळखलंच नाही. वाचा सविस्तर

थकलेला चेहरा, डोळ्यांवर चष्मा अन् घटलेलं वजन; 'तारक मेहता'मधील दयाबेनचं बदललेलं रुप पाहून चाहते थक्क
छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये 'दयाबेन'ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) सध्या चर्चेत आहे. दिशा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून आणि ग्लॅमर दुनियेपासून दूर आहे. अशातच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिचा बदलेला लूक पाहून चाहते तिला ओळखूही शकत नाहीयेत.
कसा आहे नवा लूक?
मालिकेत नेहमी रंगीबेरंगी साड्या, दागिने आणि उत्साहात दिसणारी दयाबेन खऱ्या आयुष्यात आता पूर्णपणे वेगळी दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती अत्यंत साध्या लूकमध्ये दिसत असून तिच्या चेहऱ्यावर वयाचा परिणाम जाणवत आहे. सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यामुळे तिने आपला लूक पूर्णपणे बदलला असून ती आता एक साधं जीवन जगत आहे. दयासोबत या फोटोंमध्ये तिची मुलगीही पाहायला मिळाली.

२००८ ते २०१९ या काळात दिशाने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, प्रसूती रजेवर गेल्यापासून ती मालिकेत परतलेली नाही. चाहते सतत तिच्या पुनरागमनाची प्रतीक्षा करत असतात. अशात दिशाचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी चकित झाले आहेत. अनेकांनी "आमची जुनी दयाबेन कुठे हरवली?" अशा कमेंट्स केल्या आहेत.

दिशा मालिकेत कमबॅक करणार?
दिशा वकानी सध्या आपल्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत वेळ घालवत आहे. रिपोर्टनुसार, तिची मालिकेत परतण्याची सध्या तरी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. निर्माते असित मोदी यांनी अनेकदा तिच्या परतण्याबाबत विधाने केली असली, तरी दिशाने स्वतः यावर मौन बाळगले आहे. दिशा वकानीने आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ती पडद्यावर नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे जुने आणि नवे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.