दादा कोंडकेंनी अशोक मामांना दिलेला हा कानमंत्र, त्यासाठी आजही अशोक सराफ दादांचे मानतात आभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 08:00 AM2023-09-08T08:00:00+5:302023-09-08T08:00:01+5:30

दादांच्या चाहत्यांमध्ये अशोक मामाही आहेत.

This mantra given by Dada Kondke to Ashok Saraf | दादा कोंडकेंनी अशोक मामांना दिलेला हा कानमंत्र, त्यासाठी आजही अशोक सराफ दादांचे मानतात आभार!

दादा कोंडकेंनी अशोक मामांना दिलेला हा कानमंत्र, त्यासाठी आजही अशोक सराफ दादांचे मानतात आभार!

googlenewsNext

अभिनयात एकवेळ प्रेक्षकांना रडवणं सोपं असतं पण खळखळून हसवणं अवघड असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही. अनेकदा असं होतं बघा, पडद्यावर किंवा रंगमंचावर एक सीन सुरू असतो. त्यातील प्रसंग विनोदी असतो, संवादही खुमासदार असतात, पण काही केल्या हसूच येत नाही. तिथे काहीतरी कमी असतं. मात्र ही कमी भरून काढत विनोदाचे अचूक टायमिंग साधणाऱ्या अभिनेत्यांचे वर्णन दादा कोंडके या नावाशिवाय पूर्णच होणार नाही. एक काळ होता की दादा कोंडके यांनी हिंदी सिनेमा निर्मात्यांनाही घाम फोडला होता. अभिनय, दिग्दर्शन, संवादलेखन, निर्माता अशा प्रत्येक भूमिकेत दादा कोंडके यांनी अशी काही जादू केली होती की त्या काळातील बड्या निर्मात्यांनाही दादांच्या सिनेमापुढे आपल्या सिनेमाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. दादा कोंडके यांच्या सिनेमाची ताकद आज पन्नाशीत असलेल्या प्रेक्षकांना तर माहिती आहेच, पण तरूण पिढीलाही दादांच्या सिनेमाची लोकप्रियता कळावी यासाठी झी टॉकीजने दादांच्या सिनेमांची पर्वणी आणली आहे.

दादा कोंडके यांच्या विनोदाचा वारसा पुढे समर्थपणे पेलला तो इंडस्ट्रीतील सर्वांचे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ यांनी. दादांच्या ९१ व्या जयंती निमित्त अशोक मामांनी दादांमधील विनोदी अभिनेत्याला सलाम करत त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. विनोदाची पेरणी योग्य रित्या कशी करावी याचा मंत्र दादांनी अशोकमामांना दिला होता. तो मंत्र नेमका काय होता हे सांगताना अशोक मामा दादांच्या आठवणीत भावूक झाले. दादांना जशी विनोदाची नस सापडली होती तशीच नस अशोक सराफ यांनाही सापडली आहे. दादांच्या चाहत्यांमध्ये अशोक मामाही आहेत. अशोक मामा सांगतात, “दादांचा विनोद कधीच ओढून ताणून नव्हता तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती. विनोदातील निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो. दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता. दादांच्या विनोदातील सहजता लोकांना इतकी भावली की दादांचा सिनेमा म्हणजे ज्युबिली स्टार हे समीकरणच झालं.” 

‘पांडू हवालदार’ या सिनेमाने अशोक सराफ यांच्या कारकीर्दीला कलाटणी दिली. ‘तुमचं आमचं जमलं’,‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या तीन सिनेमात अशोक मामांनी दादांसोबत काम केलं. यानिमित्ताने अशोक मामांना बोलतं केलं तेव्हा ते म्हणाले, "दादांमध्ये खूप टॅंलंट होतं. दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचत. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश सिनेमे विनोदी ढंगातील करूनही त्यांचा विनोद प्रत्येकवेळी नवीनच वाटला. सिनेमाच्या स्क्रीप्टवर त्यांची पकड होती. त्यामुळे प्रत्येक सीन पडद्यावर कसा दिसणार हे त्यांना आधीच कळायचं.लेखक राजेश मुजूमदार यांच्या साथीने दादांनी प्रत्येक सिनेमात कमाल केली आहे. दादांची हीच कमाल आता झी टॉकीजमुळे पुन्हा अनुभवता येणार याचा मला आनंद आहे."


 झी टॉकीज वाहिनीवर सध्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा सीझन सुरू आहे. दादा कोंडके यांची ९१ वी जयंती मंगळवार ८ ऑगस्टला झाली. या निमित्ताने झी टॉकीज वाहिनीवर ६ ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिली स्टार चित्रपट दाखवण्यात आले आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्याचा मनमुराद आनंद लुटला.  येत्या रविवारी १० सप्टेंबर ला ज्यूबली स्टार सीजन ची सांगता 'आली अंगावर' ह्या  चित्रपटाने होणार असून  दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा चित्रपट झी टॉकीज वर पहायला मिळणार आहे. 

Web Title: This mantra given by Dada Kondke to Ashok Saraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.