या कारणामुळे 'फुलपाखरू' मालिकेला चेतन वडनेरेनं केलेला रामराम, म्हणाला-"एका पॉईंटनंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:12 IST2025-10-06T13:11:40+5:302025-10-06T13:12:28+5:30
Chetan Vadnere : चेतन वडनेरेने एका मुलाखतीत 'फुलपाखरू'सारखी लोकप्रिय मालिका अचानक का सोडली, यामागचे कारणही सांगितले.

या कारणामुळे 'फुलपाखरू' मालिकेला चेतन वडनेरेनं केलेला रामराम, म्हणाला-"एका पॉईंटनंतर..."
स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली 'लपंडाव' ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे (Chetan Vadnere) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चेतनने यापूर्वीही अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चेतनने 'फुलपाखरू'सारखी लोकप्रिय मालिका अचानक का सोडली, यामागचे कारणही सांगितले.
चेतन वडनेरेने त्याच्या स्ट्रगलबद्दल बोलताना सांगितले की, "'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेच्या आधी मी झी मराठीवरच्या 'अल्टी पलटी सुमडीत कल्टी' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्यात शिवानी बावकर माझ्यासोबत मुख्य भूमिकेत होती. या मालिकेआधी मी 'फुलपाखरू'मध्ये काम करत होतो, पण 'फुलपाखरू'मध्ये एका टप्प्यानंतर माझ्या भूमिकेसाठी काही करण्यासारखं राहिलं नव्हतं. त्यामुळे मी चालू मालिका सोडली आणि मुख्य भूमिकेसाठी प्रयत्न करण्यासाठी नाशिकला गेलो."
सहा महिन्याच्या ब्रेकनंतर अशी मिळाली मुख्य भूमिका
माध्यमांपासून दूर राहण्याबद्दल तो म्हणाला, "चालू मालिका सोडून मी नाशिकला गेलो. तिथे जाऊन मी जिम वगैरे करू लागलो. ते गरजेचं आहे म्हणून मी केलं, नाहीतर थिएटर वगैरे माझं चालूच होतं. सहा महिने मी पूर्णपणे इंडस्ट्रीशी संबंध तोडला. मुंबईत मी कोणतीच छोटी-मोठी कामं घेतली नाहीत. नंतर असंच मी एक-दीड पानांचं ऑडिशन क्रॅक केलं... 'अल्टी पलटी'साठीच. तिथे मला पहिली मुख्य भूमिका मिळाली. ते काम पाहूनच मला काय घडलं त्या रात्री ही मालिका मिळाली, ज्यामध्ये मी निगेटिव्ह भूमिका साकारली."
'ठिपक्यांची रांगोळी'बद्दल अभिनेता म्हणाला...
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील भूमिकेबद्दलचा एक किस्सा सांगताना चेतन म्हणाला, "ठिपक्यांची रांगोळीसाठीसुद्धा मी ऑडिशन दिलेलं, पण नंतर मी निर्मात्यांना विचारलं की माझ्यासोबत आणखी कोण ऑप्शन होते. तेव्हा ते म्हणाले की 'तूच एक ऑप्शन होता'. फक्त पीपीटीसाठी आम्हाला फाईल द्यायची होती, त्यामुळे आम्ही ऑडिशन घेतलेली." शेवटी, नशिबाबद्दल आपले मत व्यक्त करताना चेतन म्हणाला की, उत्तम काम करण्यासाठी नशिबाची गरज नसते, पण उत्तम काम दाखवण्याची संधी मिळण्यासाठी नशीब लागतं. मोठे मोठे अभिनेते आता घरी बसले आहेत, जे दिसायला वगैरे चांगले आहेत, हँडसम आहेत, पण नशिबाची साथ न लाभल्याने ते घरी आहेत."