'रंग माझा वेगळा'मध्ये कार्तिकीच्या भूमिकेत साईशा ऐवजी दिसणार ही बालकलाकार, जाणून घ्या तिच्याविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:04 IST2022-06-20T16:34:12+5:302022-06-20T19:04:23+5:30
Rang Mazha Vegla: कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या साईशा भोईर (Saisha Bhoir)ने ही मालिकाला अलीकडेच सोडली. त्यानंतर तिची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

'रंग माझा वेगळा'मध्ये कार्तिकीच्या भूमिकेत साईशा ऐवजी दिसणार ही बालकलाकार, जाणून घ्या तिच्याविषयी
महाराष्ट्रातली नंबर वन मालिका ‘रंग माझा वेगळा’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. त्यानंतर आता या मालिकेतील दोन चिमुरड्या म्हणजेच कार्तिकी आणि दीपिकाने देखील आपल्या निरागस अभिनयाने घराघरात पोहचल्या आहेत. कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या साईशा भोईर (Saisha Bhoir)ने ही मालिकाला अलीकडेच सोडली. त्यानंतर तिची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
कार्तिकीच्या भूमिकेत लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. मैत्रेयीने बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे.
मैत्रेयीची ‘रंग माझा वेगळा’ ही आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र तिच्या ओळखीचं आहे. कार्तिकी आणि दीपिकाची जोडी तर तिला खूपच आवडते. आपलं आवडीचं पात्र साकारायला मिळणार हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला. सेटवरही मैत्रेयीचं खास स्वागत करण्यात आलं.
दीपिकाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या चिमुकल्या स्पृहासोबत तर तिची पहिल्या दिवासापासून छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधल्या फावल्या वेळेत अभ्यास आणि मनसोक्त खेळणं हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे मैत्रेयीसाठी हा मालिकेचा सेट नसून दुसरं घरच आहे. पडद्यामागची दोघींची ही खास मैत्री पडद्यावरही नक्कीच दिसेल.