"'शोएब'च्या डोळ्यातला आदर खऱ्याहून खरा होता...", श्रेयस राजेनं सांगितला बाप्पा आणताना आलेला 'तो' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:28 IST2025-08-28T12:27:26+5:302025-08-28T12:28:21+5:30
अभिनेता श्रेयस राजे (Shreyas Raje) च्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पांना गणेश चतुर्थीला घरी आणताना त्याला आलेला एक विलक्षण अनुभव त्याने सोशल मीडियावर सांगितला आहे.

"'शोएब'च्या डोळ्यातला आदर खऱ्याहून खरा होता...", श्रेयस राजेनं सांगितला बाप्पा आणताना आलेला 'तो' अनुभव
अभिनेता श्रेयस राजे (Shreyas Raje) सातत्याने चर्चेत येत असतो. तो आजूबाजूला घडणाऱ्या घटनेवर सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करत असतो. आता त्याच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पांना गणेश चतुर्थीला घरी आणताना त्याला आलेला एक विलक्षण अनुभव त्याने सोशल मीडियावर सांगितला आहे.
श्रेयस राजे म्हणाला की, ''मी दैवावर विश्वास ठेवणारा नसलो तरी गणेशोत्सव आवडीने साजरा करतो. कारण ह्या सणाची उर्जा मन प्रफुल्लीत करत असते. असाच एक ताजा अनुभव. माझ्या घरच्या गणपतीची यावर्षीची मूर्ती आणताना एक गाडी बुक केली होती. गाडीच्या चालकाचं नाव 'शोएब' होतं. आम्ही जेव्हा जेव्हा गणपती बाप्पा असं म्हणत होतो तेव्हा तेव्हा तो कौतुकाने आणि आनंदने 'मोरया' म्हणत होता. आणि हो त्या एकूण प्रवासातला ह्या सणाबद्दलचा त्याच्या डोळ्यातला मी पाहिलेला आदर खऱ्याहून खरा होता...''
तो पुढे म्हणाला की, ''सगळं छान आहे!! हे जग तिरस्कार आणि भेदभावाने तुडुंब भरलेलं असलं तरी आपण आपला विवेकाचा विचार जागृत ठेवून 'प्रेम' पसरवण्याचाच प्रयत्न करत राहूया नाही का? गणपती बाप्पा मोरया!!''
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, श्रेयस राजे मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'लग्नाची बेडी', 'ती परत आलीये', 'फुलाला सुगंध मातीचा', 'जिगरबाज', 'भेटी लागी जीवा' या मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मालिकांसोबत त्याने वेब सीरिजमध्येही काम केले आहे. तो 'चारचौघी' या नाटकातही झळकला आहे.