आजारपणानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीचं दमदार कमबॅक! तेजस्विनी पंडितची आईसाठी खास पोस्ट..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:19 IST2024-02-05T13:18:13+5:302024-02-05T13:19:05+5:30
'ठरलं तर मग' या मालिकेतील 'पूर्णा आजी' या पात्राला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत.

आजारपणानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीचं दमदार कमबॅक! तेजस्विनी पंडितची आईसाठी खास पोस्ट..
'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची ही मालिका हटके विषयावर आधारित असल्याने प्रेक्षक आवडीने बघत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेतील 'पूर्णा आजी' या पात्राला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. आजारपणामुळे त्यांनी शुटिंगमधून ब्रेक घेतला होता. अखेर आजारपणातून ठणठणीत बऱ्या झाल्या असून त्यांनी पुन्हा मालिकेत दमदार कमबॅक केलं आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेत अर्जुनच्या 'पूर्णा आजी'ची अर्थात अन्नपूर्णा सुभेदार यांची भूमिका अभिनेत्री ज्योती चांदेकर साकारत आहेत. त्यांची मुलगी आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ज्योती चांदेकर यांचे हेल्थ अपडेट सोशल मीडियावर दिलं, त्या आयसीयूमध्ये असल्याचं सांगितलं होत्या. ३१ जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये पूर्णा आजीने कमबॅक केलं. यानंतर तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करत आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. 'पूर्णा आजीची दमदार रिएन्ट्री, तू लढ!” असं अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
तेजस्विनी पंडित ही ज्योती चांदेकरांची मुलगी आहे, हे खूप कमी जणांना माहित आहे. सध्या त्या पूर्णा आजी म्हणून लोकप्रिय झाल्या आहेत. गेल्या काही भागांपासून पूर्णा आजीची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे आता मालिकेत पूर्णा आजीच्या पुन्हा येण्याने प्रेक्षकांना भलताच आनंद झाला आहे. 'ठरलं तर मग' ही रोमॅंटिक मालिका आहे. या मालिकेत जुईने सायलीची तर अमितने अर्जुनची भूमिका साकारली आहे. सचिन गोखले या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.